Sunday, March 15, 2026
अर्जुनी मोर

बोंडगाव देवी येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर संपन्न

अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी येथे लोककल्याणकारी योजनांच्या लाभासाठी विशेष समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींना पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.

या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हा परिषद गोंदिया अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शिबिराचे उद्घाटन करताना सांगितले की, या अभियानामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन समस्या एकाच ठिकाणी सोडवल्या जाऊ शकतात आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट गावागावांत पोहोचतो. “लोकांपर्यंत शिबिराचा लाभ पोहोचवावा” असे आवाहन करत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

शिबिरात महसूल विभागासह कृषी, पशुसंवर्धन, पोलीस, पुरवठा, तलाठी, भूमी अभिलेख, आरोग्य, महिला व बाल विकास, पंचायत समिती आदी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये सातबारा दुरुस्ती, रहिवासी/उत्पन्न प्रमाणपत्र, संजय गांधी/श्रावण बाळ योजना, पीएम किसान सन्मान निधी, आधार संबंधित कामे, शेत रस्ते, वहिवाटीचे प्रश्न यांसारख्या अनेक महसुली आणि कल्याणकारी योजनांशी संबंधित अर्ज स्वीकारले गेले आणि अनेक प्रकरणांचे तात्काळ निराकरण करण्यात आले.

कार्यक्रमात प्रमुखपणे उपस्थित होते – अप्पर जिल्हाधिकारी मिनाज जन्नत गनी मुल्ला, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे,उपसभापती संदीप कापगते,चंद्रशेखर ठवरे, श्यामकांत निवारे, रत्नाकर बोरकर, पं. स. कुंडा लोगडे, पुष्पलता दुरुगकर नायब तहसीलदार , मंडळ अधिकारी राजू उपरीकर ,पोलीस पाटील मंगला रामटेके, नायब तहसीलदार प्रकाश क्षीरसागर, पुरवठा विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी. तसेच स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

या शिबिरामुळे बोंडगावदेवी व परिसरातील शेतकरी आणि सामान्य नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा लाभ मिळाला. या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या योजनांबादी स्टाल लावण्यात आले होते.अभियान अंतर्गत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इतर गावांमध्येही अशी शिबिरे यशस्वीपणे राबवली जात असून, ग्रामीण विकासाला चालना मिळत आहे.

error: Content is protected !!