धक्कादायक घटना: वाघाच्या हल्ल्यात ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
अर्जुनी मोरगाव – अर्जुनी मोर तालुक्यातील आदर्श धाबेटेकडी येथे आज शुक्रवारी सायंकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. प्रज्वल गोवर्धन मेश्राम (वय ६ वर्षे) हा निरागस चिमुकला घराजवळ खेळत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघाने क्षणार्धात प्रज्वलला उचलून जंगलाच्या दिशेने ओढत नेले. ही घटना पाहताच कुटुंबीय व गावकऱ्यांनी आरडाओरड करत परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ग्रामस्थांनी एकत्र येत तात्काळ शोधमोहीम सुरू केली.

काही वेळानंतर घरापासून काही अंतरावर प्रज्वल गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. मात्र, या भीषण हल्ल्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गाव शोकाकुल झाले असून, परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी संबंधित वाघाचा तत्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली आहे.
ही घटना वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालींचा गंभीर इशारा देणारी ठरत असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
⚠️ वनविभागाचे नागरिकांना आवाहन :
•रात्रीच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे.
•लहान मुलांना एकटे सोडू नये.
•समूहानेच हालचाल करावी.
•जंगल परिसरात विशेष दक्षता घ्यावी.
