Sunday, April 12, 2026
गोंदिया

जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या घटकांनाही लाभ देण्यासाठी शासन तत्पर: जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

गोंदिया, दि.11 : गोंदिया जिल्ह्यातील सर्वात शेवटच्या घटकांनाही छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने विशेष मोहीम राबविली असून आज देवरी तालुक्यातील बोरगाव/बाजार येथे समाधान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले यांनी केले.

यावेळी लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप जिल्हाधिकारी श्री. गोंदावले यांच्या हस्ते करण्यात आले. देवरी तालुक्यात शिबीर स्थळी एकूण 714 लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास आमदार संजय पुराम, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार शुभम पाटील, अप्पर तहसीलदार नवनाथ कातगडे, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शासनाने आयोजित केलेले समाधान शिबिरामध्ये नागरिकांचे अधिकाधिक समस्यांचे निराकरण व्हावे, असा मानस आहे. शासकीय कार्यालयात वारंवार नागरिकांच्या फेऱ्या वाढू नये. त्यांचे समाधान तत्काळ एकाच ठिकाणी व्हावे या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.पहिल्या टप्प्यातील या दुसऱ्या भागात नागरिक अधिक जागृत झाले असून ते या शिबिरांचा लाभ निश्चितच घेतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या शिबिरात आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत माहिती देणारे दालन लावण्यात आले होते. तसेच या भागातील आदिवासी नागरिकांमध्ये असणारा ॲनिमियाचीही चाचणी करण्यात आली. त्याचप्रमाणे सिकलसेलची चाचणी करणारे दालन उभारण्यात आले होते. आज लागलेल्या शिबिरामध्ये एकूण 714 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. गोंदावले नुकतेच रुजू झाले असून महासमाधान शिबिरासाठी त्यांनी जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या देवरी तालुक्याची निवड केली हे विशेष.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात आज झालेल्या शिबिरामध्ये 1497 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. गोंदिया तालुक्यात 476 प्रकरणांचा निपटारा झाला. तिरोडा तालुक्यात 3328 बाबींचा झाला निपटारा. गोरेगाव तालुक्यात एकूण 510 लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. आमगाव तालुक्यात 159 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सालेकसा तालुक्यात एकूण 831 विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तर सडक अर्जुनी तालुक्यात 139 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.

आज झालेल्या समाधान शिबिरामध्ये निकाली काढण्यात आलेल्या विविध दाखल्यांमध्ये फेरफार दाखले, 7/12 मधील दुरुस्ती, डिजीटल 7/12, 8-अ उतारा, विविध प्रमाणपत्र, एक खिडकी योजनेंतर्गत निकाली काढण्यात आलेले अर्ज, भूसंपादन प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गांव दप्तर अद्ययावत करण्यात आलेली प्रकरणे, अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गांव दप्तर अद्ययावत करण्यात आलेली प्रकरणे आदींचा समावेश होता.

error: Content is protected !!