अवैध रेती वाहतुकीवर डूग्गीपार पोलिसांची कारवाई; ३.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
MKM NEWS 24 – सुशिल लाडे
सडक अर्जुनी (गोंदिया) : डुग्गीपार पोलीस ठाणे हद्दीत अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ६:३३ वाजताच्या सुमारास मौजा पांढरी येथील ग्रामपंचायत समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. यावेळी रंगलाल बाबुराव पटले (वय ४२, रा. सितेपार, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) हा आरोपी लाल रंगाच्या आयशर कंपनीच्या ट्रॅक्टर (क्र. MH 35 G 5689) व विनानंबर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैधरित्या रेतीची वाहतूक करताना आढळून आला.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून संबंधित वाहन ताब्यात घेतले. तपासादरम्यान ट्रॉलीमध्ये सुमारे एक ब्रास रेती आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ट्रॅक्टर (अंदाजे किंमत २,५०,००० रुपये), ट्रॉली (अंदाजे ९०,००० रुपये) आणि रेती (अंदाजे ५,००० रुपये) असा एकूण ३,४५,००० रुपयांचा समावेश आहे.
या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६२/२०२६ अन्वये संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी फिर्याद पोलीस हवालदार महेंद्र बाबुराव सोनवणे यांनी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार प्रल्हाद खोटेले करीत आहेत. पोलीस निरीक्षक वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलिसांची मोहीम सुरूच असून अशा कारवायांमुळे गैरप्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
