कोहमारा येथे सुमित किराणा दुकानात सुगंधित तंबाखू विक्री धाड
MKM NEWS 24 – सुशिल लाडे –

सडक अर्जुनी – तालुक्यातील कोहमारा येथील विलास टी.भेंडारकर यांच्या कोहमारा येथील सुमित किराणा दुकानात अन्न व औषध प्रशासन विभाग गोंदिया यांनी छापा टाकत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्तीची कारवाही केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक १७/४/२६ रोजी ही कारवाही झाली. अन्न व औषध प्रशासन विभाग गोंदिया चे अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य नानोटे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा विभागाला गुप्त माहिती मिळाली त्या गुप्त माहिती च्या आधारे दिनांक १७ एप्रिल रोजी कोहमारा येथील सुमित किराणा दुकान येथे छापा टाकला असता त्यांना प्रतिबंधित गुटका तंबाखू सुमित किराणा दुकान कोहमारा येथे मिळाले त्यात, हजारो रुपयाचा विमल पान मसाला, ईगल तंबाखू, पान पराग प्राप्त झाले.

प्रतिबंधित गुटका तंबाखू विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत मोहीम राबवली आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) पथकाने अचानक धाड टाकत अवैधरित्या साठवून ठेवलेला मोठ्या प्रमाणा मध्ये हजारो रूपयाचा गुटखा व तंबाखू जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी चैतन्य नानोटे यांनी डूग्गीपार पोलिसांत फिर्याद दिली त्यावरून कलम १२३,२१४,३२३,२७४,२७५ भारतीय न्याय संहिता, तसेच सह कलम 26(2)(i),26(2)(iv), 27(3)(d),27(3)(e),30(2)(a) , 59 आणि इतर कलमां अंतर्गत अन्न सुरक्षा मानक कायदा २००६ द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून विलास भेंडारकर भंडारा कारागृहात (MCR) वर असल्याचे पोलिसांनी सांगितले.सदर गुन्ह्याचा तपास पोलिस उप निरीक्षक देऊरकर करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यात सध्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात विकला जातो आहे. अनेक दुकानदार शासनाच्या बंदीला न जुमानता गुपचूप सुगंधित तंबाखू ,गुटखा ,विक्री करत असतात. अशी माहिती विभागाला मिळाली असता अधिकाऱ्यांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित विक्रेत्यांवर अनेक कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रशासनाकडून स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, प्रतिबंधित गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांना अजिबात सूट दिली जाणार नाही. अशा प्रकारच्या अवैध व्यवसायावर कायमस्वरूपी आळा बसवण्यासाठी पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
जनतेनेही अशा अवैध विक्रीची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याचे आवाहन डूग्गीपार पोलिस स्टेशन चे ठाणेदार गणेश वणारे यांच्या द्वारे करण्यात आले आहे.
