Friday, April 24, 2026
सड़क अर्जुनी

ग्रामविकासासाठी लोकसहभाग अनिवार्य –लायकराम भेंडारकर

सुशिल लाडे…..

सडक अर्जुनी – येथील आशीर्वाद लॉन येथे दिनांक 23 एप्रिल रोजी पंचायत विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने पंचायत परिषद सरपंच मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध गावांचे सरपंच एकत्र आले होते. सर्व सरपंच एकत्र आल्याने एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामविकासासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली.

सडक अर्जुनी येथे आयोजित सरपंच परिषद मेळाव्यात लायकराम भेंडारकर यांनी मार्गदर्शन करताना शासनाच्या विविध योजना प्रत्येक गावापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्या तरी त्याचा खरा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासाठी सरपंचांनी सक्रिय भूमिका घेत ग्रामस्थांना योजनांची माहिती देणे, त्यांची योग्य अंमलबजावणी करणे आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, गावाच्या विकासासाठी लोकसहभाग वाढवणे आणि पारदर्शक कारभार ठेवणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.भेंडारकर यांच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थित सरपंचांना विकासकामांमध्ये अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

 

मेळाव्यात गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि शाश्वत विकास या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रत्येक गावाच्या समस्या वेगळ्या असल्या तरी एकत्रित प्रयत्नांतून प्रभावी उपाय शोधता येतात, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी सरपंचांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, निधीचा योग्य वापर आणि लोकसहभाग वाढवण्याचे महत्त्व यावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे, अर्थ व बांधकाम सभापती लक्ष्मण भगत, कृषी व पशुसंवर्धन सभापती दिपा चंद्रिकापुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे , पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, आम्रपाली डोंगरवार, मुनेश रहांगडाले, योगिता पुंड, चित्रलेखा चौधरी, विना कटरे, जिल्हा परिषद सदस्य उषा मेंढे, सविता पुराम, रचना गहाणे, हनवंत वट्टी, चतुर्भुज बिसेन, जगदीश बावनथडे, वैशाली पंधरे, डॉ. भूमेश्वर पटले, विमल कटरे, कविता रंगारी, राधिका धरमगुळे, चंद्रकला डोंगरवार, उषा शहारे, माधुरी रहांगडाले, पंचायत समिती उपसभापती निशा काशिवार, संदीप कापगते, सुनंदा उके, जिल्हाध्यक्ष सरपंच संघटना चंद्रकुमार बहेकार , जिल्हाध्यक्ष ग्रामपंचायत संघटना कमलेश बिसेन, प्रमिला गणवीर, गंगाधर परशुरामकर, संग्रामेजी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत मधुकर वासनिक तसेच इतर मान्यवर आणि सरपंच, ग्रामविकास अधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या मेळाव्यामुळे गावपातळीवर विकासाची गती वाढवण्यासाठी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!