हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत १० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प; उत्कृष्ट सिंचन नियोजन व कार्याबद्दल पाणी वापर संस्थांचा गौरव
अर्जुनी मोरगाव/नवेगाव बांध- : हरित महाराष्ट्र आयोगांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ३०० कोटी वृक्ष लागवड अभियानाच्या अनुषंगाने आज मौजा नवेगाव बांध तलाव परिसरात १० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, जलसंधारण आणि हरित महाराष्ट्र निर्मितीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकारी, कर्मचारी तसेच पाणी वापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. 
कार्यक्रमादरम्यान पाटबंधारे उपविभाग नवेगाव बांध अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री बालाजी पाणी वापर संस्था, नवेगाव बांध येथील अध्यक्ष श्री. अण्णाजी पाटील डोंगरवार व सचिव श्री. महादेवजी बोरकर, तसेच बालाजी पाणी वापर संस्था, देवलगाव येथील अध्यक्ष श्री. तामदेवजी पाटील कापगते व सचिव श्री. योगराजजी पुस्तोडे यांचा सन २०२५-२६ मधील उत्कृष्ट सिंचन नियोजनाबद्दल माननीय तहसीलदार श्री. अनिवृध्दजी कांबळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
याचवेळी पाटबंधारे उपविभाग नवेगाव बांध अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन २०२५-२६ मध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत त्यांचाही गौरव करण्यात आला. श्री. अशोकजी खुणे, श्री. अण्णाजी पाटील डोंगरवार, श्री. महादेवजी बोरकर तसेच श्री. तामदेवजी पाटील कापगते यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित करत पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. नवेगाव बांध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वृक्षलागवड अभियानासोबतच उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन व शासकीय कार्यातील उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
