आमदार राजकुमार बडोले यांच्या पुढाकारामुळे प्रभाग ७ मधील धोकादायक विद्युत लाईनचे स्थलांतर
सडक अर्जुनी – सुशिल लाडे : नगर पंचायत सडक अर्जुनी अंतर्गत बाजार चौक, प्रभाग क्रमांक ७ येथील नागरिकांच्या घरांवरून गेल्या ५० ते ६० वर्षापासून विद्युत वाहक तारा गेलेले असल्याने परिसरातील नागरिकांच्या जीवितासह मालमत्तेलाही गंभीर धोका निर्माण झाला होता. या समस्येमुळे नागरिकांमध्ये सातत्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या गंभीर प्रश्नाची दखल घेत जेष्ठ नागरिक सदाराम जयराम लाडे सडक अर्जुनी (प्रभाग क्रमांक ७) यांनी प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेवून तक्रार अर्ज तयार केले आणि अर्जावर नागरिकांच्या सह्या घेऊन महावितरण (MSEB) कार्यालय सडक अर्जुनी कडे तारा व खांबांचे स्थलांतर (शिफ्टिंग) करण्याची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया, MSEB कार्यालय देवरी, तहसील कार्यालय सडक अर्जुनी, मुख्याधिकारी नगरपंचायत यांच्याकडे पाठपुरावा केला. नागरिकांची अडचण लक्षात घेता सारंग खांडेकर मुख्याधिकारी यांनी सहकार्य केले. 
या उपक्रमात नौशाद अनवर अली, सहेजाद अनवर अली, संजय बेहार, सनवर अली, साहिल अली, कैलास बेहार, मुबारक अली, यांच्यासह अनेक जागरूक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.
दरम्यान, नागरिकांनी अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याचे लक्षात घेऊन आमदार बडोले यांनी तात्काळ संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केला. आणि DPDC द्वारे निधी उपलब्ध करून दिली. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. 
आमदार राजकुमार बडोले यांच्या प्रभावी हस्तक्षेपामुळे व अथक प्रयत्नांमुळे अखेर प्रभाग क्रमांक ७ मधील धोकादायक विद्युत तारा स्थलांतर करण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या डोक्यावर असलेले संभाव्य संकट दूर झाले असून परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
जनतेच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या आमदार राजकुमार बडोले यांनी पुन्हा एकदा आपल्या लोकाभिमुख कार्यशैलीची प्रचिती दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निकाली निघाल्याने बाजार चौक, प्रभाग क्रमांक ७ येथील नागरिकांनी आमदार राजकुमार बडोले यांचे मनःपूर्वक आभार मानत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
