छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सुशिल लाडे
सडक अर्जुनी, दि. २ ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिरास सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉनमध्ये नागरिक, शेतकरी व लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
या शिबिराचे अध्यक्षस्थान राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांनी भूषविले. कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले, विधानपरिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, अपर जिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, महिला व बालकल्याण सभापती पूर्णिमा ढेंगे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, चित्रलेखा चौधरी, आम्रपाली डोंगरवार, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका शारदाताई बडोले, जिल्हा परिषद सदस्य डॉ. भुवनेश्वर पटले, रचना गणेश, सुधा रहांगडाले, जयश्री देशमुख यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, तहसीलदार इंद्रायणी गोमासे, तहसीलदार प्रज्ञा भोकेर तसेच अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत २२ ते ३० जुलै २०२६ या कालावधीत गाव व मंडळ स्तरावर शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
सदर शिबिरात विविध विभागांचे एकूण २४ स्टॉल उभारण्यात आले होते. तसेच उमेदचे ८ स्टॉल, २ आधार केंद्र, महसूल विभाग, नगर विकास विभाग, ग्राम विकास विभाग, भूमी अभिलेख विभाग, कृषी विभाग, वन विभाग, महावितरण, महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग, एकात्मिक बालविकास विभाग, पशुसंवर्धन विभाग, कामगार कल्याण विभाग, शिक्षण विभाग, सहकार विभाग, आरोग्य विभाग, आगार व्यवस्थापक साकोली, आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग, मोटार वाहन विभाग व पुरवठा विभाग यांच्यामार्फत विविध योजनांची माहिती व लाभ वितरित करण्यात आले. 
शिबिरादरम्यान एकूण १३ हजार ८९० लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन प्रत्यक्ष लाभांचे वितरण करण्यात आले. नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांनी शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत शासनाच्या योजनांचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, विविध विभागांचे अधिकारी, पत्रकार, नागरिक व लाभार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
