Thursday, August 6, 2026
गोंदिया

कर्तव्य बजावताना अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू; वनविभागात शोककळा

गोंदिया, प्रतिनिधी : न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यात कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या अचानक झालेल्या हल्ल्यात वनपाल शामू शरणागत (वय ४५, रा. तिरोडा) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे वनविभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, बुधवारी उमरझरी प्रवेशद्वार परिसरात नियमित गस्त व कर्तव्य बजावत असताना जंगलातून अचानक एक अस्वल बाहेर आले. अचानक अस्वलाने वनपाल शामू शरणागत यांच्यावर भीषण हल्ला चढवला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जवळील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर वनक्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनरक्षक व वनपालांना आधुनिक सुरक्षा साधने, संरक्षणात्मक साहित्य आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी वन कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे.

वनपाल शामू शरणागत यांच्या निधनाने वनविभागाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला असून, त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!