Thursday, August 6, 2026
गोंदियाक्राइम

घरफोडी करणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; सहा गुन्ह्यांचा उलगडा, १.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया, प्रतिनिधी : गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडी करणाऱ्या अट्टल चोराला अटक करून सहा गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत आरोपीकडून १ लाख १८ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीला अर्जुनी मोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडगावदेवी येथे २८ जुलै २०२६ रोजी घरफोडीची घटना घडली होती. घराचे कुलूप तोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ३.३६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी प्रवीण उके (वय ३०, रा. टिळक वॉर्ड, मोहाडी, जि. भंडारा) याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले.

चौकशीदरम्यान आरोपीने अर्जुनी मोरगाव येथील एक, भंडारा जिल्ह्यातील दोन, गडचिरोली जिल्ह्यातील एक तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील घरफोडीच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे, असे एकूण सहा गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपीकडून रोख २८ हजार रुपये, एक रिअलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल (२५ हजार रुपये) आणि एक होंडा सीबी शाईन मोटारसायकल (६५ हजार रुपये) असा एकूण १ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात सपोनि अमरदीप खाडे, पोहवा तुलसीदास लुटे, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, दिशीतकुमार दमाहे, सुनील डहाके, राकेश इंदुरकर तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

error: Content is protected !!