Monday, August 17, 2026
सड़क अर्जुनी

‘महाराष्ट्र का मानबिंदू’ साप्ताहिकाचा १२ वा वर्धापन दिन सोहळा थाटात संपन्न

माजी मंत्री तथा आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा

सडक अर्जुनी : हिंदी साप्ताहिक ‘महाराष्ट्र का मानबिंदू’ च्या १२ व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच MKM NEWS 24च्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळा उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात बल हॉटेल सावंगी येथे संपन्न झाला.

सविस्तर असे की, सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

साप्ताहिकाचे विमोचन….

माजी कॅबिनेट मंत्री तथा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘महाराष्ट्र का मानबिंदू’ साप्ताहिकाचे विमोचन करण्यात आले.

पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून, लोकशाही व्यवस्थेत जनतेचा आवाज शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य माध्यमे करीत असतात. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी मान्यवरांनी प्रतिपादन केले.

‘सत्य, निर्भीडता आणि समाजहित’ या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून ‘महाराष्ट्र का मानबिंदू’ आणि MKM NEWS 24ने केलेल्या वाटचालीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. ग्रामीण व सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे मांडत पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले नाते अधिक दृढ करण्याचे काम या माध्यम समूहाने केले असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

कार्यक्रमास पंचायत समिती सभापती चेतन वळगाये, गंगाधरजी परशुरामकर, सरपंच तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालिका शारदाताई राजकुमार बडोले, माजी नायब तहसीलदार अशोकजी लांजेवार, राजकुमार बडोले फाऊंडेशनचे राकेशजी भास्कर, हितेश डोंगरे, भाजप महिला तालुकाध्यक्ष शीतलताई गौर, मावीम च्या उपजीविका समन्वयक दुर्गाताई टेंभुर्णे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा संपादक डॉ. सुशिल लाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बिरला गणवीर यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश शहारे यांनी केले.

‘महाराष्ट्र का मानबिंदू’ व ‘MKM NEWS 24’चे संपादक डॉ. सुशिलजी लाडे आणि संपूर्ण परिवार यांच्यासह पत्रकार मित्र परिवारातील संपादक निलेश शहारे, बिरला गणवीर, ओमप्रकाश टेंभुर्णे, अनिल मुनिश्वर, राजेश मुनिश्वर, मुन्ना ठाकूर, सूर्यभान ठलाल यांच्यासह पत्रकार बांधव, मित्रमंडळी व हितचिंतकांची उपस्थिती होती.

पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचा संकल्प

वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने वृत्तपत्राच्या आजवरच्या प्रवासाचा आढावा घेण्यात आला. बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप झपाट्याने बदलत असले तरी सत्यता, विश्वासार्हता आणि जनहिताची बांधिलकी ही पत्रकारितेची मूलभूत मूल्ये कायम राहणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक तसेच विविध सामाजिक घटकांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम यापुढेही अधिक प्रभावीपणे सुरू ठेवण्याचा निर्धार या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

पुढील वाटचालीस मान्यवरांच्या शुभेच्छा

‘महाराष्ट्र का मानबिंदू’च्या १२ वर्षांच्या वाटचालीबद्दल तसेच MKM NEWS 24च्या ९ वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल उपस्थित मान्यवरांनी संपादक डॉ. सुशिल लाडे आणि संपूर्ण माध्यम परिवाराचे अभिनंदन केले.

“पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याचे प्रभावी साधन आहे. सत्य, निर्भीडता आणि समाजहिताची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो,” अशा मनःपूर्वक शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.

या वर्धापन दिन सोहळ्यामुळे ‘महाराष्ट्र का मानबिंदू’ आणि MKM NEWS 24च्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना अधिक व्यापक व्यासपीठ देण्याच्या आगामी वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली. उपस्थित मान्यवर व शुभेच्छुकांनी माध्यम समूहाच्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शेवटी मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: Content is protected !!