पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सडक अर्जुनी नगर पंचायतीचे नागरिकांना आवाहन; कृत्रिम तलावात विसर्जन करण्याची सोय
सुशील लाडे
सडक अर्जुनी: सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता व पर्यावरण संवर्धन राखण्यासाठी नगर पंचायत सडक अर्जुनीच्या वतीने नागरिकांना ‘पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) गणेशोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण ७.० आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत नगर पंचायतीने नागरिकांसाठी जनजागृतीपर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 
‘माझी वसुंधरा’ संकल्पनेतून पर्यावरण संवर्धनाचे आवाहन:
- प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) मूर्तींना नकार: नागरिकांनी पीओपी मूर्तींचा वापर टाळून शाडू माती किंवा कागदाच्या लगद्यापासून आणि नैसर्गिक रंगांनी तयार केलेल्या श्री गणेशाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.
- प्लॅस्टिक व थर्माकोल बंदी: मखर, आरास व सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक तसेच थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा.
- निर्माल्य व्यवस्थापन: पूजेनंतर निर्माण झालेले निर्माल्य प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये बांधून नदी किंवा नैसर्गिक जलस्रोतांमध्ये टाकू नये.
- ध्वनिप्रदूषणाला आळा: विसर्जन मिरवणुकीदरम्यान डॉल्बीसारख्या मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकांचा आणि फटाक्यांचा वापर टाळावा.
कृत्रिम तलावात विसर्जनाची सोय: नदी आणि नैसर्गिक जलाशयांचे प्रदूषण रोखण्यासाठी नगर पंचायतीने कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. सर्व गणेशभक्तांनी श्री गणेशाचे विसर्जन प्रभाग क्रमांक २, ईदगाह समोर तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावामध्येच करावे, तसेच कृत्रिम तलावातील मूर्तींचा पुनर्वापर कसा करता येईल याकडे सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
“काम करा मोलाचे, पर्यावरण संवर्धनाचे” हा संदेश देत नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, नगरसेवक/नगरसेविका, मुख्याधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व नागरिकांना इको-फ्रेंडली गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
