5 लाख 50 हजार रु.लाच मागणारी महिला ग्रामसेवक आणि पती १ लाखाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक!
गोंदिया: माजी सैनिकाला शासनाकडून मिळणाऱ्या ५ एकर शेतजमिनीच्या प्रस्तावासाठी ग्रामपंचायतीचा ठराव व एनओसी (NOC) प्रमाणपत्र तयार करून देण्याच्या मोबदल्यात १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना महिला ग्रामसेवक आणि तिच्या पतीला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोंदिया येथे रंगेहात पकडले. ही धडक कारवाई मंगळवारी, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आली.

उषा जयकृष्ण पाटील (वय ४२, पद – ग्रामसेवक, मानेगाव, ता. आमगाव) आणि तिचा पती रमाकांत ग्यानीराम मोटघरे (वय ५४, पद – विषय साधन व्यक्ती, गृह साधन केंद्र, पंचायत समिती सालेकसा) अशी लाचखोर दाम्पत्याची नावे आहेत. हे दोघेही छोटा गोंदिया येथील राधाकृष्ण कॉलनीमध्ये राहतात.
सविस्तर प्रकरण?
तक्रारदार हे ४८ वर्षीय सेवानिवृत्त सैनिक आहेत. माजी सैनिक असल्याने त्यांनी शासनाकडून ५ एकर शेती मिळण्याकरिता जिल्हाधिकारी गोंदिया यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन एनओसीचे कागदपत्रे तयार करून देण्यासाठी ग्रामसेवक उषा पाटील यांनी सरपंच व सदस्यांच्या नावाने ५ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तसेच स्वतःचे काम सुरू करण्यासाठी १ लाख रुपये वेगळे मागितले होते.याप्रकरणी तक्रारदाराने ९ ऑक्टोबर २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), गोंदिया येथे तक्रार नोंदवली होती. 
‘एसीबी’चा सापळा अन् रेडहँड कारवाई
तक्रारीच्या अनुषंगाने ९ ऑक्टोबर रोजी एसीबीच्या पथकाने पंचांसमक्ष लाच मागणीची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान आरोपींनी ५.५ लाख रुपयांची मागणी कायम ठेवून स्वतःचे काम सुरू करण्यासाठी १ लाख रुपये १३ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथील स्वतःच्या घरी आणून देण्यास सांगितले.
त्यानुसार, आज १३ ऑक्टोबर रोजी एसीबीने आरोपींच्या राहत्या घरी सापळा रचला. तक्रारदार रक्कम घेऊन गेले असता, महिला ग्रामसेवक उषा पाटील हिने इशारा केल्यावरून तिचा पती रमाकांत मोटघरे याने तक्रारदाराकडून १,००,००० रुपये (एक लाख रुपये) लाच रक्कम स्वीकारली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले.
या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक ८४४/२०२६, कलम ७ व १२ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविसकर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया एसीबीचे पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक अरविंद राऊत, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले तसेच अंमलदार बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले आणि डांगे यांच्या पथकाने केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया (तिरोडा रिंग रोड, रेल्वे गेट जवळ; दूरध्वनी: ०७१८२-२५१२०३ / ९२०९०४१०६४, ईमेल: acbgondia@gmail.com) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर तात्काळ संपर्क साधावा.
