Friday, June 19, 2026
गोंदिया

29 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित एकस्तर वेतनश्रेणी लागू करा –

29 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना सुधारित एकस्तर वेतनश्रेणी लागू करा.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदियाची मागणी
गोंदिया : आदिवासी व नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि. 6 ऑगस्ट 2002 च्या शासन निर्णयानुसार एकस्तर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत राज्य शासनाने दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी स्पष्टीकरणात्मक शासन निर्णय जारी केला आहे. त्या अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना सुधारित एकस्तर वेतनश्रेणी (S-14) लागू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, जिल्हा गोंदिया यांनी केली आहे.

यासंदर्भात शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देताना एस-13 ऐवजी एस-14 वेतनश्रेणी तसेच एक काल्पनिक वेतनवाढ लागू करण्याची मागणी संघटनेने केली.

यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देताना चटोपाध्याय वेतनश्रेणीच लागू करण्यात आली होती. मात्र शासन निर्णयानुसार कार्यरत पदाच्या नजिकच्या अथवा पदोन्नतीच्या पदाची वेतनश्रेणी देणे अपेक्षित असल्याने ही त्रुटी दुरुस्त करून सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी शिक्षक संघाने केली आहे.

या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत लवकरच शासन निर्णयानुसार योग्य तो निर्णय घेऊन आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर बावनकर यांनी दिली.

सुधारित एकस्तर वेतनश्रेणी लागू झाल्यास ज्या शिक्षकांना आतापर्यंत हा लाभ मिळाला नाही, त्यांनाही फायदा होणार असून आंतरजिल्हा बदलीने गोंदिया जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनाही लाभ मिळणार आहे. तसेच जुलै 2002 पासून थकबाकीसह लाभ मिळण्याची शक्यता असल्याचेही बावनकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा गोंदिया ही संघटना शिक्षकांच्या हक्कासाठी कटिबद्ध असून सुधारित एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ शिक्षकांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे त्यांनी नमूद केले.

error: Content is protected !!