छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना तत्परतेने सेवा प्रदान : लायकराम भेंडारकर
गोंदिया, दि.7 : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना तत्परतेने सेवा पोहचविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी समन्वयाने काम करण्याची भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आज येथे केले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महागाव मंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिल्या टप्प्यातील प्रथम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. भेंडारकर बोलत होते. या समाधान शिबिरात जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे, जि.प. सदस्य जयश्री देशमुख, पंचायत समिती सदस्य नाजुक कुंभरे, जिल्हाधिकारी प्रजित नायर, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे, तहसिलदार अनिरुध्द कांबळे, प्रशासक महागाव ग्रामपंचायत प्रभाकर कोवे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
श्री. भेंडारकर पुढे म्हणाले, शासनाचे निर्णय, धोरण, योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अशाप्रकारच्या शिबिरांची अत्यंत गरज आहे. गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहचावा हा या मागचा हेतू आहे.जिल्हाधिकारी श्री. नायर यांनी प्रशासन दुर्गम भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहचून अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. कामकाजात त्रुटी, अडचणी असल्यास त्यावर सकारात्मकतेने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
•जिल्ह्यातील आठही तालुक्यात महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
गोंदिया तालुक्यातील गोंदिया मंडळात जलाराम लॉन गोंदिया या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार विनोद अग्रवाल, पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार श्रीकांत कांबळे उपस्थित होते. यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
तिरोडा तालुक्यातील परसवाडा मंडळात जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय परसवाडा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, तहसिलदार नारायण ठाकरे व लोकप्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली मंडळात गुरुकृपा लॉन येथे निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, परिविक्षाधीन अधिकारी साईकिरण नंदाला, माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
देवरी तालुक्यातील ककोडी मंडळात ग्रामपंचायत कार्यालय मुरमाडी येथे आमदार संजय पुराम, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, अपर तहसिलदार चिचगड नवनाथ कातकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
आमगाव तालुक्यातील तिगाव मंडळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभुरटोला येथे नायब तहसिलदार श्री. वेलादी यांच्या उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द मंडळात ग्रामपंचायत कार्यालय तिरखेडी येथे तहसिलदार नरसय्या कोंडागुर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा मंडळात जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शेंडा येथे तहसिलदार प्रेरणा कटरे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
