सडक अर्जुनी तालुक्यात शासकीय जमिनीवरून मुरूमची बेकायदेशीर लूट; प्रशासन झाला धृतराष्ट्र
सडक अर्जुनी ,१४ एप्रिल २६ – सडक अर्जुनी तालुक्यात खनन माफियांचा धुमाकूळ सूर असून आज १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ जयंती सर्वीकडे साजरी होत आहे. सर्व शासकीय कार्यालयाला सुट्टी आहे याचाच फायदा घेऊन तालुक्यात शासकीय जागेवरील शासकीय मालमत्तेवर हात साफ करण्याचा सपाटा जोरात सुरू असल्याची खात्रीशीर बातमी सूत्रांकडून मिळाली आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील एका सरकारी जागेतून विनापरवाना मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पहाटेच्या सुमारास सुरू असलेल्या या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नागरिकांच्या प्रत्यक्ष पाहणीत असे दिसून आले की, जेसीबी मशीनच्या साहाय्याने मुरूम खोदून ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये भरला जात असून तो बाहेर नेण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेसाठी कोणताही अधिकृत परवाना घेतलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे सांगितल्या जात आहे.
कायद्यानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८ नुसार सरकारी जमिनीतील खनिजे (मुरूमसह) शासनाच्या मालकीची असतात. परवानगीशिवाय मुरूम उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा असून दोषींवर मुरूमच्या किंमतीसह पाचपट दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय, चोरीच्या स्वरूपावरून भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अंतर्गतही गुन्हा दाखल होण्याची तरतूद आहे. मुरूम हा ‘गौण खनिज’ गटात येत असल्याने अशा प्रकरणांमध्ये महसूल विभागाकडून पंचनामा करून दंडात्मक कारवाई केली जाते.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील काही दिवसांपासून सातत्याने ही अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे सरकारी मालमत्तेचे आणि महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असतानाही संबंधित महसूल व वन विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
एका कंत्राटदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर हे सांगितले की, हे खनन माफियां ज्या ठिकाणा मधून मुरूम, रेती( खनिज संपत्ती) चोरी करणार असतात पहिल्यांदा हे त्या एरियातील संबंधित शासकीय कर्मचारी यांचे चांगलेच हात ओले करीत असतात जे ने करून ते डोळे बंद करतील आणि खनन माफियां सरकारी खनिज संपत्ती भरभरून चोरी करू शकतील.
सांगायचे म्हणजे तालुक्यात सुरू असलेल्या अवैध खनिज संपत्तीचा लूट संबंधी सुजान नागरिकांनी या प्रकरणात संबंधित अधिकारी यांचे चांगलेच हात ओले झाले असून अधिकारी आणि खनन माफियां यांचे संगनमत असल्याचे आरोप करीत आहेत.
