निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून राजकीय पक्ष व पत्रकारांना निमंत्रण
सडक अर्जुनी, दि. १६ : नगर पंचायत सडक अर्जुनी येथे होणाऱ्या पोटनिवडणूक कार्यक्रम-२०२६ अनुषंगाने १८ मे रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नगर पंचायत प्रशासनाने राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच पत्रकारांना निवेदन पाठविले आहे.
नगर पंचायत सडक अर्जुनी कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया यांच्या आदेशानुसार राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमधील ( प्रभाग क्रमांक ११ ) या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नगर पंचायत सडक अर्जुनीचा समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी तहसीलदार सडक अर्जुनी आनंद जाधव यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नगर पंचायत मुख्याधिकारी सागर खांडेकर यांची सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पत्रानुसार, दिनांक १८ मे २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता नगर पंचायत कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली असून संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.