Tuesday, May 19, 2026
महाराष्ट्र

विधान परिषदेच्या १६ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; १८ जूनला मतदान

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ रिक्त जागांसाठी निवडणुकीचे अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मतदान १८ जून २०२६ रोजी होणार असून, मतमोजणी २२ जूनला पार पडेल.

मुंबई – महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला आहे, कारण राज्यातील विधान परिषदेच्या काही स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये लवकरच निवडणुकीची रणधुमाळी उडणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील १६ रिक्त जागांसाठी अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी पार पडणार असून, मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होईल.

निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक घेण्यासाठी किमान ७५% संस्था कार्यरत असणे आणि किमान ७५% पदे भरण्यात येणे आवश्यक असते. याआधी, महाराष्ट्रात या अटी पूर्ण झाल्या नसल्यामुळे या जागांवर वेळेवर निवडणूक घेता आलेली नव्हती. मात्र, आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार या सर्व अटी पूर्ण झाल्याने आयोगाने तत्परतेने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. अधिकृत अधिसूचना २५ मे २०२६ रोजी जारी होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून २०२६ असून, अर्जांची छाननी २ जून २०२६ रोजी होईल. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस ४ जून २०२६ ठरवण्यात आला आहे. मतदान सकाळी ८ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत होईल, आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचे काम २२ जून २०२६ रोजी पार पडेल.

या १६ जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ संपलेला आहे, ज्यामध्ये सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, उस्मानाबाद-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि औरंगाबाद-जालना यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेसोबतच संबंधित मतदारसंघांमध्ये ‘आदर्श निवडणूक आचारसंहिता’ लागू झाली आहे. या जागांवर नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांच्या संख्येबळानुसार राजकीय भविष्य ठरणार असल्याने, महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आता स्थानिक राजकारणात जोरदार गती येणार आहे आणि या निवडणुकीतून आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!