Tuesday, May 26, 2026
क्राइमगोंदियासड़क अर्जुनी

३८ किलो ५०० ग्रॅम गांजासह कार व मोबाईल जप्त; दोन आरोपी ताब्यात, एक फरार

सडक अर्जुनी/ गोंदिया : जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) गोंदियाने मोठी कारवाई करत तब्बल ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत गांजाची वाहतूक करणारी चारचाकी कार, चार मोबाईलसह एकूण ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक गोंदिया गौरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. एल.सी.बी. पथक डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, रायपूर (छत्तीसगड) येथून नागपूरकडे गांजाची वाहतूक केली जाणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सौंदड परिसरातील रेल्वे उड्डाणपुलाजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, संशयित काळ्या रंगाची महिंद्रा थार कार दिसताच पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून वाहन थांबविले. त्यावेळी वाहनातील तीन इसम जंगलाच्या दिशेने पळू लागले. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी पकडले तर एक आरोपी जंगलाचा फायदा घेत फरार झाला.

वाहनाची पंचांसमक्ष तपासणी केली असता सीटखाली प्लास्टिक पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेले ४० बंडल आढळले. त्यामध्ये ३८ किलो ५०० ग्रॅम हिरव्या ओलसर गांजाचा साठा मिळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत २८ लाख ५० हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा थार कार १५ लाख रुपये आणि चार मोबाईल ८० हजार रुपये किंमतीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विवेककुमार अभिनीकुमार जोशी (वय २२, रा. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) आणि विधी संगर्ष बालक (रा. नारायणगड, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) यांचा समावेश आहे. फरार आरोपीचे नाव सुफियान उर्फ सोफी राजा (वय २८, रा. राजनगर, डोंगरगड, जि. राजनांदगाव) असे असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गौरव भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल.सी.बी.चे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेकर तसेच त्यांच्या पथकाने केली.

error: Content is protected !!