Saturday, June 20, 2026
सड़क अर्जुनी

१००० किलोमीटर दूर असले तरी मुंडे साहेबांची दहशत; सडक अर्जुनी मध्ये खर्रे विकणाऱ्यांची उडाली झोप..

सडक अर्जुनी –  कडक शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि भ्रष्टाचारविरोधातील आक्रमक भूमिकेमुळे ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांनी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारताच राज्यभर धडक कारवाईचा सपाटा लावला आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या तपासणी मोहिमेमुळे व्यापारी, खाद्य व्यवसायिक आणि भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे संकेत मिळाल्यानंतर अनेक ठिकाणी पानटपऱ्या बंद झाल्याचे दिसून येत आहे.

कारवाईची दहशत एवढी वाढली आहे की, गुटखा आणि पानमसाल्याची सर्रास विक्री करणाऱ्या अनेक पानटपऱ्या बंद आहेत.

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच प्रतिबंधित सुगंधित तंबाखूच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली असून, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. विशेषतः सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याबाबत ( सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर मकोका लावणार) त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक पानटपरी चालक आणि विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

सध्या तरी कित्येक पानटपरी बंद असलेल्या स्वरूपात पहावयास मिळाले. सडक अर्जुनी इथून एक हजार किलोमीटर लांब राहणाऱ्या मुंडे साहेबांची दहशत सुगंधित तंबाखू ,गुटखा, खर्रा विक्री करणाऱ्या वर चांगलीच झाली असल्याचे दिसून येत आहे.

आयुक्त मुंडे यांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिल्यानंतर तालुक्यातील अनेक ठिकाणी पानटपऱ्या बंद ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, सडक अर्जुनीपासून शेकडो किलोमीटर दूर बसूनही मुंडे यांच्या कारवाईची धास्ती स्थानिक विक्रेत्यांमध्ये दिसून आल्याने नागरिकांमध्येही याबाबत चर्चा रंगली आहे.

आरोग्यास घातक असलेल्या सुगंधित तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थांच्या विक्रीवर शासनाने बंदी घातलेली असतानाही काही ठिकाणी त्यांची चोरीछुपे विक्री होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरू केलेल्या मोहिमेचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की, केवळ कारवाईची भीती निर्माण करून न थांबता तालुक्यात नियमित तपासणी मोहीम राबवून प्रतिबंधित पदार्थांची विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामुळे युवकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल आणि कायद्याचे पालनही सुनिश्चित होईल.

“मुंडे साहेबांच्या कठोर भूमिकेमुळेच अनेक ठिकाणी नियमभंग करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, प्रशासनाने ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी,” अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

error: Content is protected !!