Saturday, June 20, 2026
सड़क अर्जुनी

पहाटेच्या सापळ्यात सागवान तस्कर अडकले; डोंगरगाव डेपो परिसरात वन विभागाची मोठी कारवाई

सडक अर्जुनी : वन विभागाने डोंगरगाव डेपो परिसरात पहाटेच्या सुमारास राबविलेल्या विशेष मोहिमेत सागवान लाकडाच्या अवैध वाहतुकीचा प्रयत्न हाणून पाडत तीन संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत लाखो रुपयांचा मौल्यवान सागवान साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेले बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.

सुत्राद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, सहव्याघ्र क्षेत्रातील डोंगरगाव डेपो परिसरात काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागाच्या पथकाने रात्रीपासूनच परिसरावर गुप्तपणे नजर ठेवली होती. पहाटे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान साले-धारणी मार्गावरून जाणाऱ्या एका बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (MH 35 AJ 1154 )वाहनाची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान वाहनात लपवून ठेवलेले मोठ्या प्रमाणातील सागवान लाकूड आढळून आले. वन अधिकाऱ्यांनी तत्काळ वाहन जप्त करून त्यातील सागवान साठा ताब्यात घेतला. याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वन कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू आहे.

या कारवाईचे नेतृत्व क्षेत्र सहाय्यक कु. व्ही. बी. रहिले आणि सी. एम. डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मोहिमेत वन कर्मचारी पवन कांबळे, मेहमूद सय्यद, विवेक काईट, सहसराम हटवार, माधव मुसुळे, वनीता ब्राह्मणकर, शालू मेंडे, यशवंत शेंडे, श्रीकांत बंसोड आणि समीर बंसोड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

वन विभागाच्या या कारवाईमुळे सागवान तस्करीच्या साखळीवर मोठा आघात झाल्याची चर्चा असून अवैध वृक्षतोड आणि तस्करीविरोधात विभागाने आणखी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.

error: Content is protected !!