सडक अर्जुनी येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत BLA व BLO यांची बैठक संपन्न
सुशिल लाडे…
सडक अर्जुनी, दि. 11 जुलै : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने तहसील कार्यालय सडक अर्जुनी येथे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी (BLA) व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक तहसीलदार कार्यालयातील दालनात सकाळी 11 वाजता पार पडली.
उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गोंदिया श्री. विजय अवघाणे तसेच उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अर्जुनी/मोर श्रीमती ज्योती कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत मतदार गणना पत्रके भरून ती संबंधित BLO यांच्याकडे सादर करून त्यांचे डिजिटायझेशन करण्याच्या कामास गती देण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. अवघाणे यांनी ज्या BLO यांचे डिजिटायझेशनचे काम शून्य ते 10 टक्क्यांच्या दरम्यान आहे, त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या. तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातील कामकाजात टाळाटाळ करणाऱ्या BLO विरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अंतर्गत कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. 
बैठकीस तहसीलदार श्रीमती इंद्रायणी गोमासे, नायब तहसीलदार श्री. जगदीश जांभुळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. अविनाश काशीवार, शिवसेना प्रमुख श्री. नानू निकमकर, नगरसेवक श्री. महेंद्र जैपाल वंजारी, नगरसेवक श्री. अंकित भंडारकर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, BLO, पर्यवेक्षक व BLA उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी उपजिल्हाधिकारी श्री. अवघाणे यांनी सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना Enumeration Forms चे डिजिटायझेशन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनीही संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता करण्यात आली.
