Sunday, August 30, 2026
सड़क अर्जुनी

सुशिल लाडे….

सडक अर्जुनी : शहराच्या विकासासोबतच महापुरुषांच्या स्मृती आणि विचारांचा वारसा जपण्याच्या दृष्टीने सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांच्या सौंदर्यीकरण कार्याचे भूमिपूजन दि. २८ ऑगस्ट रोजी माजी सामाजिक न्याय मंत्री तथा अर्जुनी मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंजी. राजकुमार बडोले यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.

दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या मागणीची दखल घेत सौंदर्यीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ व सुशोभित होणार असून शहराच्या सौंदर्यातही निश्चितच भर पडणार आहे. मात्र, या उपक्रमाचे महत्त्व केवळ सौंदर्यीकरणापुरते मर्यादित नसून महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाला अभिवादन करण्याचा हा प्रयत्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाला समता, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य व बंधुतेचा मार्ग दाखविला. भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि सन्मान मिळवून देण्याचा ऐतिहासिक पाया घातला. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आधुनिक भारताच्या उभारणीत, लोकशाही मूल्यांच्या जपणुकीत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांचे पुतळे एकाच शहरात सन्मानाने उभे राहणे ही सामाजिक ऐक्य, संविधानिक मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांची प्रेरणादायी खूण आहे.

“पुतळ्यांचे सौंदर्यीकरण व्हावेच; मात्र महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात उतरले, तरच खऱ्या अर्थाने त्यांना अभिवादन ठरेल.”

या उपक्रमामुळे नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्याची ओळख होण्यास मदत होणार असून समता, बंधुता, लोकशाही, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचणार आहे.

कार्यक्रमाला आमदार राजकुमार बडोले, नगराध्यक्ष तेजराम मडावी, नगरपंचायत चे सभापती व नगरसेवक, मुख्याधिकारी सारंग खांडेकर, डॉ. अविनाश काशिवार, प्रशांत शहारे ,रजनी गिऱ्हेपुंजे, सदाराम लाडे, रोशन बडोले, विदेश टेंभुर्णे, तथा समाजबांधव , नगरातील नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.  उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत करून सौंदर्यीकरणाच्या कामास शुभेच्छा दिल्या.

महापुरुषांच्या स्मृती जपण्यासोबतच त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प नागरिकांनी केला, तर सडक अर्जुनी शहर विकासासोबत सामाजिक एकात्मतेचेही आदर्श उदाहरण ठरू शकते, अशी सकारात्मक भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!