Sunday, September 6, 2026
सड़क अर्जुनी

लाकडी नंदीबैलांनी सजली सडक अर्जुनीची बाजारपेठ; तान्हा पोळ्याची चाहूल

सुशिल लाडे…

•सडक अर्जुनीमध्ये आठवडी बाजारात नंदीबैलांची लागली बाजारपेठ

•तान्हा पोळ्याची चाहूल; लाकडी नंदीबैल खरेदीसाठी पालकांची लगबग

सडक अर्जुनी : बळीराजाचा सण म्हणून ओळखला जाणारा पोळा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असून, बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या तान्हा पोळ्याची लगबगही सुरू झाली आहे.आज  शनिवार, ५ सप्टेंबर रोजी सडक अर्जुनी येथे भरलेल्या आठवडी बाजारात लाकडी नंदीबैल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने बाजारपेठेला तान्हा पोळ्याची रंगत आली.

तान्हा पोळा हा विशेषतः लहान मुलांच्या उत्साहाचा सण आहे. या दिवशी मुले आकर्षक रंगरंगोटी केलेले लाकडी नंदीबैल घेऊन मिरवणुकीत सहभागी होतात. त्यामुळे तान्हा पोळा जवळ येताच बाजारात विविध आकार, रंग आणि आकर्षक सजावट केलेले लाकडी नंदीबैल विक्रीसाठी येऊ लागले आहेत.

सडक अर्जुनीच्या आठवडी बाजारात सौंदड येथील कलाकारांनी तयार केलेले विविध प्रकारचे लाकडी नंदीबैल विक्रीसाठी आणले होते. आकर्षक रंग, नक्षीकाम आणि कलाकुसरीमुळे हे नंदीबैल लहान मुलांसह पालकांचेही लक्ष वेधून घेत होते.

नंदीबैलांच्या किमती साधारण ३ हजार रुपयांपासून ९ हजार रुपयांपर्यंत असल्याचे विक्रेता कलाकाराने सांगितले. आपल्या मुलांची हौस पूर्ण करण्यासाठी पालक आवडीने नंदीबैलांची खरेदी करताना दिसून आले.

‘हौसेला मोल नसते’ असे म्हटले जाते. बदलत्या काळात तान्हा पोळ्याचे स्वरूपही काहीसे बदलले असले तरी लहान मुलांमधील उत्साह आणि पारंपरिक संस्कृतीची ओढ कायम आहे. नागपूरसह पूर्व विदर्भात तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाकडी नंदीबैलांच्या खरेदी-विक्रीमुळे सडक अर्जुनीच्या बाजारपेठेतही सणाच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!