Wednesday, September 9, 2026
गोंदिया

शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीचे शिल्पकार’:- लायकराम भेंडारकर जि.प.अध्यक्ष

गोंदिया : स्व. वसंतराव नाईक सभागृह, जिल्हा परिषद गोंदिया येथे शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर होते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व उत्कृष्ट कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच गोंदिया जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा मिळणार आहे.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे शिल्पकार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना योग्य दिशा, संस्कार आणि प्रेरणा देण्यासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करावेत. बदलत्या काळानुसार ज्ञान व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असून, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळते. शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याला प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन सातत्याने होणे आवश्यक असल्याचेही अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी सांगितले. अशा गौरव सोहळ्यांमुळे शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक वातावरण अधिक बळकट होऊन विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयासाठी मेहनत करण्याची नवी उमेद मिळते.

कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ चंद्रा दोन्तुला, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे, अर्थ व बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, समाज कल्याण सभापती रजनी कुंभरे, महिला व बालकल्याण सभापती पोर्णिमा ढेंगे, पशु व कृषी सभापती दिपा चंद्रिकापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, तुमेश्वरी बघेले, लक्ष्मी तरोणे, चतुर्भुज बिसेन, हनवंत वट्टी, अश्विनी पटले, जयश्री देशमुख, अनंदा वाढीवा, वैशाली पंधरे, रीतेष मलघाम, छबुताई उके, प्रिती कतलाम, उषाताई शहारे आणि वंदना काळे, पंचायत समिती सदस्य हुपराज जमईवार यांच्यासह शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पवन खंडारे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधीर महामुनी, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालकवर्ग तसेच शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करणारा हा सोहळा शैक्षणिक क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन मिळावे आणि विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेची व यशाची नवी प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमातून शिक्षकांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त होण्यासोबतच गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाची दखल घेण्यात आली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक स्पर्धा आणि उत्कृष्ट कार्याची प्रेरणा निर्माण होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

error: Content is protected !!