Friday, September 11, 2026
अर्जुनी मोर

21 लाख थकल्याने 3 गावांचे पाणी बंद, जनता तहानलेली – शिवसेना (UBT) चा प्रशासनाला 8 दिवसांचा अल्टिमेटम!

अर्जुनी मोरगाव,-  गोंदिया जिल्ह्यातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. रामपुरी, खांबी आणि शिरेगाव या चार गावांना पाणीपुरवठा करणारी महत्त्वाची पाणीपुरवठा योजना तब्बल 9 दिवसांपासून बंद आहे. कारण काय? तर 21 लाख रुपयांचे वीजबिल थकले म्हणून!

एकीकडे शासन ‘हर घर जल’ च्या गप्पा मारतंय आणि दुसरीकडे हजारो नागरिकांना गेल्या 9 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे. नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मात्र कुंभकर्णी झोपेत आहे.

या संतापजनक प्रकाराविरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे.

त्वरित पाणीपुरवठा योजना सुरू न केल्यास आठ दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग नवेगाव/बांध यांच्या मार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांना निवेदन देण्यात आले.

> “पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. केवळ वीजबिल थकल्याच्या कारणावरून चार गावांचे पाणी बंद करणे हा प्रशासनाचा निष्काळजीपणा आहे. आठ दिवसात योजना सुरू न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल.”

निवेदन देताना जिल्हा प्रमुख शैलेश जायसवाल, युवा सेना तालुका प्रमुख ओमराज कोल्हे, विभाग प्रमुख कृष्णा चांदेवार, शाखा प्रमुख मुकेश चापेकर, पिंटू बोरकर, भास्कर बाळबुद्धे, हितेश हांडेकर यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता प्रशासन जागे होते की शिवसेनेच्या आंदोलनाची वाट पाहते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!