घाटबोरी तेली जिल्हा परिषद शाळेतील प्रकार; सिमेंटच्या कणांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
सुशिल लाडे..


सडक अर्जुनी – जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, घाटबोरी तेली येथे वर्गखोलीच्या दरवाजाजवळ अंदाजे मागील वर्षभरापासून सिमेंटच्या गोण्या ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दीर्घकाळ पडून राहिल्याने या गोण्या आता खराब व कुजलेल्या अवस्थेत असून, त्यातून सिमेंटचे बारीक कण वर्गखोलीत उडत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
वर्गखोलीच्या प्रवेशद्वाराजवळच सिमेंटच्या गोण्या पडून असल्याने विद्यार्थ्यांची ये-जा होताना तसेच वाऱ्यामुळे सिमेंटचे कण वर्गात पसरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराच्या वेळीदेखील हे कण अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असल्याने स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गांभीर्याने घेण्याची गरज आहे.
सिमेंटची धूळ दीर्घकाळ श्वसनातून शरीरात जाणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला किंवा श्वसनाशी संबंधित त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता, शाळेच्या परिसरातील अशा साहित्याची तातडीने विल्हेवाट लावणे अथवा सुरक्षित ठिकाणी हलवणे आवश्यक असल्याची मागणी पालकांकडून होत आहे.
केंद्र प्रमुख हरिणखेडे मॅडम यांनी सांगितले की, ग्रामपंचायत कार्यालय द्वारे काही कामा करिता काही महिन्यापूर्वी सिमेंट बोऱ्या ठेवल्या होत्या. परंतु सूत्राच्या माहिती नुसार गेल्या अंदाजे एक वर्षापासून ह्या बोऱ्या पडून आहेत. प्रश्न हा निर्माण झाला आहे की, शालेय विद्यार्थी यांच्या वर्ग खोलीजवळ असल्यामुळे त्या कुजलेल्या बोऱ्यांमुळे आता बारीक कण हे श्वसनाद्वारे मुलांना आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आणि आहारामध्ये सुद्धा काही सिमेंट कण गेले तर आरोग्यावर परिणाम होऊ शकण्याची दाट शक्यता आहे. 
एकीकडे शासनाकडून जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या वर्गखोलीच्या परिसरात वर्षभरापासून सिमेंटच्या गोण्या पडून राहणे आणि त्या खराब अवस्थेत पोहोचणे ही बाब शाळा प्रशासन, शिक्षक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या निदर्शनास का आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी शैक्षणिक वातावरण मिळणे ही संबंधित यंत्रणेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकाराची तातडीने पाहणी करून सिमेंटच्या गोण्या हटवाव्यात आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. 
मुख्याध्यापिकांशी संपर्काचा प्रयत्न
या प्रकरणाबाबत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा घाटबोरी तेली येथील मुख्याध्यापिका मरसकोल्हे मॅडम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणावर शाळा प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
“विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे; जबाबदारी निश्चित होणार का?”
वर्गाच्या दारात वर्षभरापासून सिमेंटच्या गोण्या पडून राहिल्याचा आरोप खरा असल्यास, त्या इतका काळ का हटविण्यात आल्या नाहीत, त्यांची देखरेख कोणाची होती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करण्यात आल्या, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
“जिल्हा परिषद शाळेत प्रवेश वाढवा” असे आवाहन करणाऱ्या यंत्रणेने विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण देण्याची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडणे गरजेचे आहे. आता या प्रकाराची दखल घेऊन संबंधित प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने कोणती पावले उचलते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
सुभाष बागडे BO सडक अर्जुनी
“सदर प्रकरणाची चौकशी करून कारवाही करण्यात येईल.”
केंद्रप्रमुख हरिणखेडे मॅडम
” मी मुख्याध्यापक यांना मागेच सांगितले होते, की ह्या कुजलेल्या सिमेंट बोऱ्या हटवा म्हणून, विद्यार्थ्यांना आरोग्यास त्रास होत आहे म्हणून. आता निश्चित बाजूला केल्या जातील मुलांच्या आरोग्याशी जळजोळ केली जाणार नाही.”
