Thursday, October 8, 2026
सड़क अर्जुनी

सौंदड रेल्वे उड्डाणपुलावर अखेर एका बाजूने वाहतूक सुरू; नागपूर–रायपूर मार्गावरील कोंडीला मिळणार दिलासा

सुशिल लाडे

सडक अर्जुनी/सौंदड : सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे नागपूर–रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ आणि गोंदिया–चांदाफोर्ट रेल्वेमार्गाच्या क्रॉसिंगवर सुरू असलेल्या बहुप्रतिक्षित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला आता प्रत्यक्ष वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे वळण मिळाले आहे. आज दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळपासून पुलाच्या एका बाजूने नागपूरकडून रायपूरच्या दिशेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सौंदड रेल्वे गेट परिसरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता. वाहतूक कोंडी बद्दल विविध वृत्त पत्राने बातम्या सुद्धा प्रकाशित केल्या होत्या.

पुलाचे बांधकाम गेल्या काही वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. रेल्वे गेट बंद झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. अनेक वेळा सौंदड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना तासन्तास अडकून पडावे लागत होते.

अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दिलासा

सौंदडमधून जाणारा NH-53 हा नागपूर–रायपूरसह मुंबई–कोलकाता मार्गाशी जोडणारा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक, ट्रक, बस तसेच अन्य वाहनांची ये-जा असते. त्यामुळे रेल्वे गेट बंद झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा परिणाम केवळ स्थानिक नागरिकांवरच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या प्रवाशांवरही होत होता.

उड्डाणपुलाचे काम सुरू असताना वाहतूक सर्व्हिस रोडवरून वळवण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक या मार्गावरून होत असल्याने सर्व्हिस रोडचीही दुरवस्था झाली होती.  ग्रामपंचायत स्तरावरूनही संबंधित कंत्राटदाराकडे पुलाचे काम गतीने पूर्ण करण्याची तसेच सर्व्हिस रोड दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली होती.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त

उड्डाणपुलाचे काम अपूर्ण असल्याने मागील काही महिन्यांत सौंदड परिसरात वारंवार वाहतूक कोंडी झाली. सप्टेंबर २०२६ मध्ये तर NH-53 वर अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याच्या घटना समोर आल्या होत्या. काही प्रसंगी वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली होती.

त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होणे ही सौंदडसह नागपूर–रायपूर मार्गावरील वाहनचालकांसाठी मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.

दुसरी बाजू कधी सुरू होणार?

सांगायचे म्हणजे अर्जुनी मोरगाव विधानसभेचे आमदार राजकुमार बडोले यांनी 2 ऑक्टोबर रोजी पुलाच्या कामाची पाहणी केली होती आणि प्राप्त माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी एकेरी वाहतूक सुरू करा अशा सूचना दिल्या होत्याचे सांगितले जाते. तसेच खासदार प्रशांत पडोळे यांनी सुद्धा पाहणी केली होती.

अलीकडील आमदार आणि खासदार पाहणी व संबंधित माहितीनुसार, उड्डाणपुलाची एका बाजूची कामे जवळपास पूर्ण झाल्यानंतर ६ किंवा 8 ऑक्टोबरपासून नागपूरकडून रायपूरकडे जाणारी वाहतूक एका बाजूने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. उर्वरित बाजूचे काम पूर्ण करून डिसेंबर २०२६ पर्यंत दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती समोर आली आहे.

आता प्रत्यक्षात 7 ऑक्टोबर रोजी एका बाजूने वाहतूक सुरू झाल्याने सौंदड रेल्वे गेटवरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, पुलाचे उर्वरित काम पूर्ण होऊन दोन्ही दिशेची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत वाहनचालकांनी संबंधित डायव्हर्जन आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

सौंदडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपण्याच्या मार्गावर असून, उड्डाणपूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.