नायलॉन मांजाचा वापर केल्यास २५ हजारांचा दंड; विक्री व साठवणुकीवर २ लाख ५० हजारांचा दंड
गोंदिया : नायलॉन मांजा आणि सिंथेटिक मांजामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण होत असून, पक्षी व प्राण्यांनाही इजा होत आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार गोंदिया जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरासह विक्री व साठवणुकीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर २५ हजार रुपये, तर विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. 
नायलॉन व सिंथेटिक मांजामुळे गळा कापणे, गंभीर दुखापत होणे तसेच जीवितहानी होण्याच्या घटना घडतात. याशिवाय पक्षी व प्राण्यांनाही या मांजामुळे इजा होत असल्याने जिल्ह्यात त्याच्या वापरावर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोणत्याही सज्ञान व्यक्तीने नायलॉन मांजाने पतंग उडविताना आढळल्यास संबंधित व्यक्तीस २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच अल्पवयीन मुलगा किंवा मुलगी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविताना आढळल्यास संबंधित मुलाच्या किंवा मुलीच्या पालकांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे कोणत्याही दुकानात, ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अथवा व्यक्तीकडे नायलॉन किंवा सिंथेटिक मांजाचा साठा आढळल्यास किंवा त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विक्रेत्यावर २ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. हा दंड प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्रपणे लागू राहणार आहे.
दंडाची रक्कम घटनास्थळी जमा न केल्यास संबंधित व्यक्तीला १५ दिवसांच्या आत दंड भरणे बंधनकारक राहील. निर्धारित मुदतीत दंडाची रक्कम जमा न केल्यास संबंधित महसूल अधिकाऱ्यामार्फत कायदेशीर प्रक्रिया राबवून जमीन महसुलाप्रमाणे दंडाची वसुली करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात नायलॉन मांजाची विक्री, साठवणूक किंवा ऑनलाइन माध्यमातून अवैध व्यवहार होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ संबंधित पोलीस स्टेशन, डायल ११२, सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया किंवा पोलीस नियंत्रण कक्ष गोंदिया येथे माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांनी केले आहे.
नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित पतंगोत्सव साजरा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
