अनुसूचित जाती घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचणे हेच योजनांचे खरे फलित – अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला
छायाचित्र प्रदर्शनी व पथनाट्यातून योजनांची प्रभावी जनजागृती
गोंदिया, दि. 11 : अनुसूचित जातीतील घटकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष पात्र नागरिकांपर्यंत पोहोचणे हेच योजनांचे खरे यश असून, समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. या प्रदर्शनीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 
या कार्यक्रमाला सहाय्यक आयुक्त (सामाजिक न्याय) किशोर भोयर, तहसीलदार समशेर पठाण, अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, पत्रकार तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री. मुल्ला पुढे म्हणाले, सामाजिक समतेचा पाया मजबूत करण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी मोलाचे कार्य केले, तर राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात आरक्षणासारख्या उपाययोजनांद्वारे अनुसूचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग खुला केला. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रदर्शनांचा उपयोग होतो. या योजनांची माहिती आपल्या संपर्कातील लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही त्यांनी केले. 
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी सिकलसेल आजाराबाबत माहिती देत आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांनी आपला सामाजिक व आर्थिक स्तर उंचवावा आणि इतरांनाही याबाबत माहिती द्यावी, असे सांगितले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या या जनजागृती उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
तहसीलदार समशेर पठाण व अपर तहसीलदार श्रीकांत कांबळे यांनी प्रशासकीय इमारतीत येणाऱ्या नागरिकांना विविध योजनांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणे हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असे मत व्यक्त केले.
छायाचित्र प्रदर्शनी मध्ये विविध योजनांचा समावेश
*छायाचित्र प्रदर्शनी मध्ये एकूण 46 योजना* लावण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय निवासी शाळा, भारत सरकारची मॅट्रिक उत्तर शिष्यवृत्ती, सैनिकी शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता, राजश्री छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार, मिनी ट्रॅक्टर योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, कन्यादान योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांचे प्रदर्शनी दालन आहे.

हे प्रदर्शन आज बुधवारपासून सुरू झाले असून शुक्रवार पर्यंत असणार आहे. प्रदर्शन पाहण्यासाठीची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी अनुसूचित जातीतील घटकांसाठी च्या प्रदर्शनीचा लाभ उचलावा असे, आवाहन सहायक आयुक्त किशोर भोयर आणि जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी केले आहे.
पथनाट्यातून लोकजागृती
विक्रम फडके यांच्या असर फाउंडेशनच्यावतीने लोककलाकारांनी पथनाट्य सादर करून अनुसूचित जातीतील घटकांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली. मनोरंजनातून दिलेल्या या संदेशामुळे उपस्थित नागरिकांना योजनांची माहिती प्रभावीपणे समजली. तसेच येथे 360 अंश फिरणारा सेल्फी स्टँडही ठेवण्यात आल्या आहे.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी केली, तर सूत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी केले.
