Sunday, April 5, 2026
क्राइमअर्जुनी मोर

नोकरीच्या आमिषाने ६.७५ लाखांची फसवणूक; अर्जुनी मोरगाव तालुक्यात खळबळ

अर्जुनी मोरगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील धाबेटेकडी (आदर्श) येथे सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका युवकाची तब्बल ६ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाबेटेकडी येथील रहिवासी प्रेमचंद एकनाथ कुम्भरे यांना पंचायत समितीत डेटा एंट्री ऑपरेटर पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. आरोपी ललित जनार्दन कुम्भरे व सुग्रेश तागडे (रा. बामणी/ खडकी) यांनी संगनमत करून १ मे २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत एकूण ६ लाख ७५ हजार रुपये रोख स्वरूपात स्वीकारले.

AI imege
AI imege

नोकरी लागेल या आशेवर फिर्यादीने मोठी रक्कम दिली; मात्र बराच कालावधी उलटूनही कोणतीही नियुक्ती न झाल्याने संशय निर्माण झाला. वारंवार पाठपुरावा करूनही टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी फिर्यादीने अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे नोकरीच्या आमिषाला बळी पडणाऱ्या युवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोणत्याही सरकारी किंवा खासगी नोकरीसाठी पैसे देण्यापूर्वी संबंधित बाबींची खातरजमा करावी आणि अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!