कुणबी समाज संघटनेची डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
सडक अर्जुनी : बनावट फेसबुक आयडी तयार करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी कुणबी समाज संघटना, सडक अर्जुनी यांच्या वतीने डुग्गीपार पोलीस ठाण्यात निवेदन (तक्रार) देण्यात आली आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करून गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी संघटनेने केली आहे.


तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, “दिनेश ब्राम्हणकर” हे नाव प्रामुख्याने कुणबी समाजात आढळत असल्याने संबंधित व्यक्तीने जाणूनबुजून कुणबी समाजाला बदनाम करण्याचा तसेच विविध समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ओबीसी व कुणबी समाज हा महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा समाज असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महापुरुषांची बदनामी करून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
