₹45 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेतला कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
•₹45 हजारांची लाच घेताना जिल्हा परिषदेतला कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात
•पेन्शन काम लवकर करून देणे आणि ₹1.92 लाखांची रिकव्हरी वाचवण्यासाठी मागितली होती ₹50 हजारांची लाच
गोंदिया, दि. 12 : जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य लेखा व वित्त विभाग कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक संदेश चंद्रशेखर सांबरे (वय 35) याला ₹45 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहाथ पकडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई 11 मे 2026 रोजी करण्यात आली. माहितीनुसार, तक्रारदार हे 31 मे 2026 रोजी सेवानिवृत्त होणार असून त्यांच्या पेन्शनसंबंधी कागदपत्रांची प्रक्रिया जिल्हा परिषद गोंदिया येथील मुख्य लेखा व वित्त अधिकारी कार्यालयात सुरू होती. तक्रारदारांनी 7 मे रोजी संबंधित कार्यालयात जाऊन पेन्शनचे काम पाहणारे कनिष्ठ सहाय्यक संदेश सांबरे यांची भेट घेतली होती.

तक्रारदारांना ही मागणी लाचेची असल्याची खात्री पटल्याने त्यांनी 11 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आली असता आरोपीने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान आरोपी संदेश सांबरे याने तक्रारदाराकडून पंच क्रमांक 1 यांच्या समक्ष ₹45 हजारांची लाच स्वीकारली. त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान आरोपीकडून ₹45 हजारांची लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून वापरातील आयफोन 15 प्रो मॅक्स मोबाईलदेखील जप्त करण्यात आला आहे. आरोपीच्या घरझडतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली. या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद राऊत करीत आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत उगले यांच्या नेतृत्वाखाली एसीबी गोंदिया पथकाने केली. नागपूर परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बाविस्कर आणि विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले असून कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास तात्काळ एसीबीशी संपर्क साधावा, असे म्हटले आहे.
