Friday, May 15, 2026
गोंदिया

गोंदिया जिल्हा सलग चौथ्यांदा राज्यात ‘प्रधानमंत्री आवास योजनेत’ प्रथम

सुशिल लाडे….MKM NEWS 24 
गोंदिया दि 15 : ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्याने दैदीप्यमान कामगिरी केली असून चौथ्यांदा राज्यात प्रथम येण्याचा विक्रम केला आहे.
केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व किसान कल्याण मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या शुभहस्ते आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया जिल्ह्याला प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी स्वीकारला.

महा आवास अभियान 2023-24 अंतर्गत जाहीर झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये गोंदिया जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, या योजनेत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान गोंदिया जिल्ह्याला सलग चौथ्यांदा मिळाला आहे. जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशाचा गौरव करण्यासाठी आज शुक्रवार रोजी सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.

जिल्ह्याने मिळवलेल्या या यशात जिल्हा परिषद प्रशासन आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा मोठा वाटा आहे. जिल्हयाने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे तसेच विभागीय स्तरावरही नागपूर विभागाने आपली छाप सोडली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत नागपूर विभागाने राज्यात तृतीय क्रमांक पटकवला आहे, तर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नागपूर विभाग राज्यात प्रथम ठरला आहे. सलग चौथ्या वर्षी मिळालेल्या या ऐतिहासिक यशामुळे जिल्ह्याचे नाव संपूर्ण राज्यात गाजत आहे.

लोकसहभाग आणि सांघिक प्रयत्नांचा विजय: जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर
“प्रधानमंत्री आवास योजनेत गोंदिया जिल्ह्याने सलग चौथ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक पटकावणे ही आम्हा सर्व जिल्हावासीयांसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रीया पूरस्कार स्विकारल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले, जिल्हा परिषद प्रशासन, ग्रामीण विकास यंत्रणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारे कर्मचारी यांच्या चिकाटीमुळेच हे यश शक्य झाले आहे. मुख्य म्हणजे लाभार्थ्यांनी प्रशासनावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला प्रतिसाद यामुळेच आम्ही हा ‘चौकार’ गाठू शकलो. गरीब कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर असावे, हे आमचे मुख्य ध्येय असून जिल्ह्याचा हा लौकिक भविष्यातही असाच कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” असे ही श्री. भेंडारकर म्हणाले.

error: Content is protected !!