Friday, May 15, 2026
क्राइमगोंदिया

राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

•राष्ट्रीय महामार्गावर जबरी चोरी करणारा आरोपी २४ तासांत जेरबंद

•स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाची धडाकेबाज कारवाई; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया 15 मे 26: राष्ट्रीय महामार्गावर मोटारसायकलस्वारांना अडवून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, गोंदियाने अवघ्या २४ तासांच्या आत अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

फिर्यादी नेकराम लोकचंद शहारे (वय ५७, रा. खडकी/बाहेणी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) यांनी पोलीस स्टेशन देवरी येथे दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२ मे २०२६ रोजी रात्री १० ते १०.३० वाजताच्या सुमारास देवरी आठवडी बाजार करून मोटारसायकलने आपल्या गावी परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावर एका अनोळखी इसमाने त्यांची मोटारसायकल अडवून जबरीने जवळील ३ हजार रुपये रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर मोबाईलमधील ‘गुगल पे’ अ‍ॅपचा वापर करून वेगवेगळ्या पेट्रोल पंपावर जाऊन फिर्यादीच्या खात्यातून ४९,८०० रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले. अशाप्रकारे आरोपीने एकूण ५२ हजार रुपयांची जबरी चोरी केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी पोलीस स्टेशन देवरी येथे  अपराध क्रमांक १८६/२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), १९६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी आरोपीचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला होता.

तपासादरम्यान आरोपी रायपूर, छत्तीसगड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन आरोपी अयान अब्दुल करीम खान (वय १९, रा. शास्त्री मार्केट, नवा मटन मार्केटजवळ, लोहारपारा, रायपूर, छत्तीसगड) याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान आरोपीने देवरी येथील कोहिमारा परिसरात फिर्यादीची दुचाकी अडवून रोख रक्कम व मोबाईल हिसकावल्याची कबुली दिली. तसेच मोबाईलमधील ‘गुगल पे’ अ‍ॅपचा वापर करून विविध पेट्रोल पंपांवरून ४९ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केल्याचेही निष्पन्न झाले.

आरोपीकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे :

रॉयल एनफिल्ड हंटर कंपनीची लाल-काळ्या रंगाची दुचाकी – किंमत २ लाख रुपये ,रोख रक्कम – २० हजार रुपये, आयफोन मोबाईल – किंमत ५५ हजार रुपये ,असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपीला पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन देवरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलीस हवालदार दामोदर दमाहे, दुर्गेश तिवारी, प्रकाश गायकवाड, इंजिन बिसेन, पोलीस शिपाई रोशन इंदुरकर व घनश्याम कुंभलवार यांनी केली.

error: Content is protected !!