Wednesday, June 10, 2026
गोंदिया

महापुरुषांची बदनामी प्रकरण : गौरेश बावनकर यांचा जामीन अर्ज फेटाळला

गोंदिया /सडक अर्जुनी : महापुरुषांविषयी आक्षेपार्ह व बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर प्रसारित केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गौरेश उर्फ दिनेश यशवंत बावनकर यांचा जामीन अर्ज गोंदिया येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२ न्यायालयाने फेटाळला आहे. शुक्रवारी (दि. १५ मे) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हा आदेश दिला.

माहितीनुसार, सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार परिसरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि मजकूर प्रसारित झाल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.

तक्रारीनुसार, बनावट सोशल मीडिया आयडी तयार करून महापुरुषांविषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आल्याचा आरोप आहे. या पोस्टमुळे समाजात जातीय तेढ निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. घटनेनंतर विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

दरम्यान, आरोपीच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत अर्जदाराच्या वकिलांनी आरोपीला जामीन देण्याची मागणी केली. तर सरकारी पक्ष आणि तक्रारदाराच्या वतीने जामिनाला विरोध करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर करत तो फेटाळला.

प्रकरणाची माहिती

  • कोर्ट : जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश-२, गोंदिया
  • दिनांक : १५ मे २०२६
  • प्रकरण : जामीन अर्ज (क्रि. बेल अर्ज/0000155/2026)
  • निकाल : जामीन अर्ज फेटाळला (Rejected)
  • नोंद : E-Courts सेवेमध्ये “Rejected” अशी नोंद करण्यात आली आहे.
error: Content is protected !!