धान खरेदी मर्यादा १० लाख क्विंटलने वाढवावी; मका खरेदीसाठी खाजगी गोदामे उपलब्ध करून द्यावीत : आमदार राजकुमार बडोले
मुंबई/गोंदिया : अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान बडोले यांनी दोन महत्त्वाच्या मागण्यांसाठी पत्रे सादर केली असून यात खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये धान उत्पादनात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत (MSP) वर धान विक्रीसाठी अतिरिक्त १० लाख क्विंटल खरेदी मर्यादा मंजूर करण्याची आणि मका खरेदी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी खाजगी गोदामे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. 
धान खरेदी मर्यादेत वाढ करण्याची मागणी
अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या तीन तालुक्यांत खरीप हंगामात धानाचे उत्तम उत्पादन झाले आहे. सरासरी ३९ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पन्न नोंदवले गेले आहे. मात्र सध्याची खरेदी मर्यादा अपुरी पडल्याने अनेक शेतकऱ्यांना MSP दरात धान विकता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांकडे कमी दराने विक्री करावी लागत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजकुमार बडोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून आणि त्यांची भेट घेऊन अतिरिक्त १० लाख क्विंटल धान खरेदी मर्यादा तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. “शेतकऱ्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळाले पाहिजे. सध्याची मर्यादा वाढवल्यास शेतकऱ्यांना MSP चा लाभ मिळेल आणि त्यांचे आर्थिक नुकसान टळेल,” असे बडोले यांनी पत्रात नमूद केले आहे.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न
आमदार राजकुमार बडोले यांनी शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवर सातत्याने पाठपुरावा करत असतात. मंत्रालयात सादर केलेल्या या दोन्ही पत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांचे तथ्यात्मक विश्लेषण करत तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली असून मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या या मागण्यांना लवकरात लवकर मान्यता मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “आमदार बडोले यांनी आमच्या समस्या मंत्रालयापर्यंत पोहोचवल्या आहेत. आता शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला दिलासा द्यावा,” अशी भावना शेतकऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा मतदारसंघातील कृषी क्षेत्रात व्यक्त होत आहे.
