सौंदडमध्ये नियम धाब्यावर! महामार्ग रोखून ओव्हरहाइट वाहनांची अवैध वाहतूक? आशीर्वाद कुणाचे..!
सौंदड (सडक अर्जुनी) : गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर दररोज रात्री घडणारा एक धक्कादायक प्रकार आता नागरिकांच्या संतापाचा विषय बनला आहे. सामान्य वाहनचालकांना तासन्तास रस्त्यावर अडकवून ठेवले जात असताना काही उंच व अवजड (ओव्हरडायमेंशनल) वाहनांसाठी संपूर्ण महामार्गच रोखला जात असल्याचा हा खेळ कित्येक वर्षांपासून सुरू आहे. विशेष म्हणजे हा प्रकार एखाद-दुसऱ्या दिवशी नव्हे, तर नियमितपणे सुरू असल्याचा असून सुद्धा प्रशासन का बरं कारवाही करीत नाही असा खडा सवाल स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

महामार्गावर ‘रेड कार्पेट’, नागरिक मात्र वेठीस
रात्रीच्या सुमारास रेल्वे फाटक पार करण्यासाठी अत्यंत उंच वाहनांची ने-आण केली जाते. हा काळा ऑपरेशन फाटक खेळ रोजच रात्री च्या सुमारास केला जातो. या प्रक्रियेदरम्यान दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविली जाते. परिणामी शेकडो वाहनांच्या रांगा लागतात. रुग्णवाहिका, प्रवासी बस, मालवाहू ट्रक, आणि खासगी वाहनधारक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
स्थानिकांच्या मते, “काही मोजक्या वाहनांसाठी हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचा अधिकार नेमका कोणाला दिला?” हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने उपस्थित होत आहे.
रेल्वेचा ब्लॉक, वीजपुरवठा बंद आणि मग सुरू होते ‘ऑपरेशन फाटक’
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील उच्चदाब विद्युत वाहिन्यांमुळे उंच वाहनांना फाटकातून नेणे शक्य नसते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेऊन वीजपुरवठा बंद केला जातो!. त्यानंतर काही वाहनांच्या टायरमधील हवा सोडली जाते, काहींवर तांत्रिक उपाय केले जातात, तर काही ठिकाणी हायड्रा मशीनच्या मदतीने मार्ग मोकळा केला जातो असे नागरिकांनी स्पष्ट सांगितले आहे.

या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प होते. मात्र या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली परवानगी, सुरक्षा मानके आणि प्रशासकीय मंजुरी याबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
उड्डाणपूल रखडला, त्रास मात्र जनतेला
सौंदड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कामाचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. उड्डाणपूल वेळेत पूर्ण झाला असता तर आज महामार्गावर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. 
सामान्यांसाठी नियम, मग या वाहनांसाठी सूट का?
रस्त्यावर एखादे आंदोलन झाले किंवा काही मिनिटे वाहतूक अडवली गेली तरी तत्काळ पोलिस कारवाई होते गुन्हे नोंद होतात. मग राष्ट्रीय महामार्गावर दररोज वाहतूक रोखून सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? हा प्रश्न आता चर्चेचा विषय बनला आहे.
महामार्ग पोलिसांचे उत्तरही धक्कादायक
या संदर्भात महामार्ग पोलिस केंद्र डोंगरगाव ( कॅम्प डूग्गीपार ) राजू बस्तरवाडे यांना विचारणा केली असताना म्हणाले की, “नागरिकांनी तक्रार दिल्यास कारवाई करू” असे सांगितले आहे. मात्र दररोज घडणाऱ्या या प्रकाराची माहिती संबंधित यंत्रणांना नाही, असे मानणे कठीण असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.
चौकशीची करून संबंधितावर गुन्हा नोंद करणार काय?
सौंदड येथे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या या प्रकाराची स्वतंत्र चौकशी करून संबंधित विभाग, कंत्राटदार, परवानगी देणाऱ्या यंत्रणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करावी, योग्य चौकशी करून कारवाही करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तसेच रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून नागरिकांची कायमस्वरूपी सुटका करावी, अशी मागणी होत आहे.
जनतेचा सवाल
“राष्ट्रीय महामार्ग हा सर्वांसाठी की काही निवडक वाहनांसाठी?”
सौंदडमधील हा प्रकार आता केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून सार्वजनिक सुरक्षा, प्रशासनाची जबाबदारी आणि कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा गंभीर विषय बनला आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास एखादी मोठी दुर्घटना घडल्याशिवाय यंत्रणा जागी होणार का, महामार्ग पोलिस चे पोलिस अधीक्षक DCP लोहित मतानी याकडे लक्ष देतील काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
