Friday, June 19, 2026
सड़क अर्जुनीदुर्घटना

सडक अर्जुनीत पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; पाच जणांना चावा, नगरपंचायत झोपेत?

सुशील लाडे…..

सडक अर्जुनी : शहरात भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता त्रास आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. सडक अर्जुनी येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने अक्षरशः हैदोस घालत तब्बल पाच नागरिकांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राप्त माहितीनुसार आज शहरात  ५ ते ६ व्यक्तींना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. नागरिक प्रथम उपचारकरीता ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले त्यात काही नागरीकांना प्राथमिक उपचार करून गोंदिया येथे रेफर करण्यात आले.

पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतलेले काही नागरिक हे सध्या ग्रामीण रुग्णालय.सडक अर्जुनी येथे उपचार करीत गेले होते त्यात पंकज राऊत कोहडीटोला,अमरदीप बोरकर पांढरवाणि हे नागरिक आहेत. तर काही नागरिक गोंदिया येथे रेफर करण्यात आले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कुत्रा रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांवर अचानक हल्ला करत आहे. चावा घेतलेल्या व्यक्तींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अशा घटना वारंवार घडत असताना नगरपंचायत प्रशासन मात्र हातावर हात धरून बसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांचा सवाल आहे की, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि नियंत्रणासाठी कोणती ठोस उपाययोजना करण्यात आली आहे? शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणेही धोकादायक बनले आहे.

स्थानिकांनी नगरपंचायत प्रशासनाला इशारा देत म्हटले आहे की, तात्काळ कारवाई करून पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा तसेच भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

“पाच जणांना चावा घेईपर्यंत प्रशासन जागे होत नसेल, तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची?” असा संतप्त सवाल सडक अर्जुनीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

सडक अर्जुनीसारख्या नगरपंचायत क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत नगरपंचायतीवर काही कायदेशीर जबाबदाऱ्या आहेत. मात्र, कुत्र्यांना पकडून दुसरीकडे सोडणे किंवा मारणे कायद्याने परवानगी नाही.

संबंधित कायदे व नियम

Animal Birth Control Rules, 2023 नुसार स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका) यांनी भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण, निर्बिजीकरण (ABC), लसीकरण आणि नोंदणी करणे आवश्यक आहे.

Prevention of Cruelty to Animals Act, 1960 अंतर्गत प्राण्यांवर क्रूरता करणे किंवा विनाकारण त्यांना मारणे बेकायदेशीर आहे.

स्थानिक संस्थांनी रेबीजग्रस्त किंवा आक्रमक कुत्र्यांची तक्रार मिळाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे.

नगरपंचायतीची जबाबदारी

•भटक्या कुत्र्यांच्या तक्रारींची नोंद घेणे. •कुत्र्यांना पकडून पशुवैद्यकीय तपासणी करणे. •रेबीजची शंका असल्यास विलगीकरण (Isolation) करणे. •निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम राबविणे.•नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे.

” नगरपंचायत द्वारे पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी कार्यालयामार्फत कर्मचारी गेले आहेत. भटकंती आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करू.”

यूगल दडमल – कर प्रशासक अधिकारी ,नगर पंचायत सडक अर्जुनी

error: Content is protected !!