अल्पवयीन वाहनचालक, अवैध धंदे व वाहतूक समस्यांवर कडक कारवाईचे संकेत
सडक अर्जुनी – सुशिल लाडे : पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे ठाणेदार कमलेश सोनटक्के यांनी नुकतेच पदभार सांभाळला आहे. आपल्या हद्दीतील समस्या आणि समन्वय साधण्यासाठी त्यांनी आज शांतता समितीची बैठक बोलावली होती.
ठाणेदार कमलेश सोनटक्के यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या सभेमध्ये समितीच्या सदस्यांनी ठाणेदार यांचे स्वागत केले. बैठकीत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, अवैध धंद्यांवर नियंत्रण तसेच नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


सामाजिक वातावरण दूषित करणारे धंदे त्यात परिसरातील अवैध दारूविक्री, सट्टा पट्टी, अमली पदार्थ,गांजा विक्री व इतर अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहणार अशी आश्वासन ठाणेदार यांनी दिले.
शाळांच्या परिसरात सुरू असलेल्या पानटपऱ्यांमुळे सुगंधित तंबाखू सेवन केल्यामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्दा उपस्थित करून अशा टपऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे सुचविण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला उभे राहणारे ट्रक व जड वाहने अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने संबंधित यंत्रणांनी याकडे विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. तसेच वृद्ध नागरिक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्या ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ठाणेदार कमलेश सोनटक्के यांनी नागरिकांनी कायद्याचे पालन करून परिसरातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. बैठकीस शांतता समिती सदस्य सरपंच गंगाधर परशुरामकर , प.स.सभापती चेतन वळगाये, मुख्य संपादक सुशिल लाडे, मुख्य संपादक निलेश शहारे, येरने जी, मेश्राम जी, परमानंद बडोले , राजकुमार भगत, शाहिद पटेल , अनिल मुनिश्वर, मेहजबीन राजानी, भिवगडेताई, झोडावणे ताई, आणि इतर सदस्य उपस्थित होते.
