Friday, July 31, 2026
सड़क अर्जुनी

हद्दच झाली! डूग्गीपारपर्यंत वाहतूक कोंडी; सौंदड रेल्वे पुलाच्या संथ कामामुळे नागरिक हैराण

सडक अर्जुनी -( सुशिल लाडे) : सौंदड येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला लागलेला विलंब आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे. पुलाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने परिसरात दररोज भीषण वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या रांगा थेट डूग्गीपारपर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे प्राप्त माहितीनुसार काल ३० जुलै रात्री पासून मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम झाली आहे. तर आज ३१ जुलै ला सुद्धा सौंदड रेल्वे फाटक पाऊण डूग्गीपार पर्यंत ५ किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. महामार्ग पोलिस वाहनांची कोंडी सोडविण्यासाठी कसरत करीत आहे.

परिणामी हजारो प्रवासी, रुग्णवाहिका, बसेस, विद्यार्थी, शेतकरी, आपत्कालीन सेवा आणि व्यावसायिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

रेल्वे पुलाच्या कामासाठी मुख्य मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली असली तरी पर्यायी मार्गांची क्षमता अपुरी ठरत आहे. अवजड वाहनांची वाढती वर्दळ, रस्त्यांची दुरवस्था आणि कामातील विलंब यामुळे सकाळ व सायंकाळच्या वेळेत परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. अनेक वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने इंधनाचा अपव्यय होत असून आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, पुलाचे काम अपेक्षित वेगाने पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्रीचा वापर होत नसल्याने समस्या अधिकच वाढली आहे. रुग्णवाहिका, शालेय बसेस आणि अत्यावश्यक सेवांनाही वाहतूक कोंडीचा फटका बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, प्रशासन आणि संबंधित विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत पुलाच्या कामाला तातडीने गती द्यावी, तसेच वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही काही सामाजिक संघटनांनी दिला आहे.

सौंदड रेल्वे पुलाचे रखडलेले काम आणि वाढती वाहतूक कोंडी हा आता केवळ गैरसोयीचा नव्हे तर जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे.

error: Content is protected !!