Tuesday, September 22, 2026
सड़क अर्जुनी

कोकणा मध्ये ‘हरित विकासा’चा संकल्प; सेवा संकल्प अभियानातून वृक्षलागवड

सडक अर्जुनी : विकासकामांसोबत गावाचा परिसर हिरवागार आणि पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने सेवा संकल्प अभियानांतर्गत कोकणा येथे वृक्षलागवड उपक्रम राबविण्यात आला. अर्जुनी-मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

गावाच्या विकासाचा वेग वाढत असताना पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच आवश्यक आहे. याच विचारातून कोकणा परिसरात फळझाडांसह विविध उपयुक्त वृक्षांची लागवड करण्यात आली. केवळ रोपे लावण्यापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता त्यांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

यावेळी आमदार राजकुमार बडोले यांनी ‘विकासासोबत पर्यावरणाचेही रक्षण’ करण्याचे आवाहन केले. वृक्ष हे केवळ सावली किंवा फळ देणारे साधन नसून पर्यावरणाचा महत्त्वाचा आधार आहेत. वाढते प्रदूषण, हवामानातील बदल आणि पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता प्रत्येक गावाने वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवर विविध समाजोपयोगी उपक्रमांना चालना दिली जात आहे. कोकणा येथील वृक्षलागवडीतून गावाला अधिक हिरवेगार स्वरूप देण्यासोबतच नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ग्रामस्थ, महिला बचत गट आणि सामाजिक घटकांनी लावलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी पुढाकार घेतल्यास हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, निशाताई तोडासे, पंचायत समिती सभापती चेतन वडगाये, पंचायत समिती सदस्य शिवाजी गहाणे, गटविकास अधिकारी आदित्य ठाकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी खोटेले, विस्तार अधिकारी तथा ग्रामपंचायत प्रशासक शहारे, विस्तार अधिकारी पटले, कृषी विस्तार अधिकारी पटले, खेमराज पाटील भेंडारकर, माजी पंचायत समिती सभापती कविता भेंडारकर, माजी सरपंच अमर रोकडे यांच्यासह ग्रामस्थ, महिला बचत गटांच्या सदस्या व विविध मान्यवर उपस्थित होते.

रोप लावण्यापासून ते त्याचे झाड होईपर्यंतची जबाबदारी स्वीकारण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमामुळे कोकणा परिसरात ‘हरित गाव’ संकल्पनेला चालना मिळाली.

error: Content is protected !!