कुक्कुट पालन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ३०० हून अधिक पशुपालकांचा सहभाग
सडक अर्जुनी : पशुसंवर्धन विभाग, सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने मंगळवार, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी कुक्कुट पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला तालुक्यातील पशुपालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ३०० हून अधिक पशुपालकांनी दिवसभर उपस्थित राहून शास्त्रोक्त कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण घेतले तसेच चर्चा सत्रात सहभाग नोंदविला.
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान. प्रा. डॉ. मुकुंद कदम, विभाग प्रमुख, कुक्कुटशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय, माफसू यांनी दिवसभर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन सौ. निशा काशिवार, उपसभापती, पंचायत समिती, सडक अर्जुनी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. शालिंदर कापगते, सदस्य, पंचायत समिती, सडक अर्जुनी होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. अल्लाउद्दीन राजानी, सदस्य, पंचायत समिती, सडक अर्जुनी उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात सौ. निशा काशिवार यांनी शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व कुक्कुट पालन व्यवसाय करण्याचे आवाहन केले. पशुसंवर्धन विभाग तालुक्यात चांगले काम करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
अध्यक्षीय भाषणात श्री. शालिंदर कापगते यांनी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक विविध जोडधंदे करून आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन केले. तसेच काही दिवसांत तालुक्यात सहकारी तत्त्वावर दूध संकलन केंद्रे सुरू होणार असून, त्याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. मुकुंद कदम यांनी मोठ्या संख्येने पशुपालक उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या चार तासांच्या मार्गदर्शनात त्यांनी कुक्कुट पालनातील विविध संधी, कोंबड्यांचे खाद्य व पाणी व्यवस्थापन, लसीकरण तसेच औषधोपचार याबाबत सविस्तर माहिती दिली. 
पशुपालकांचे ज्ञान वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने यापुढेही वारंवार अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, जेणेकरून सडक अर्जुनी तालुक्यातील पशुपालकांची आर्थिक उन्नती साधता येईल, अशी अपेक्षा उपस्थित पाहुणे व पशुपालकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. गुणवंत भडके, सहाय्यक आयुक्त, तालुका पशुचिकित्सालय, सडक अर्जुनी व श्री. कय्युम शेख, पशुधन विकास अधिकारी, गट-ब यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. रोहित नेवारे, श्री. हिमांशु झिगरे, श्री. महेश बोकारे, श्री. भूषण खरकाटे, श्री. लिकेश येरणे, श्री. जयेंद्र साखरे, श्री. प्रणय उमक, श्री. ओमप्रकाश चामलाटे, श्री. निरंजन कापगते, श्री. जयंपाल गोबाडे व श्री. निमराव शहारे यांनी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे श्री. मोहन डोंगरवार व श्री. अमोल डेकाटे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी तसेच श्री. बबलू वलथरे व श्री. देवानंद राऊत, पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन श्री. पंकज वाघाये, पशुधन विकास अधिकारी यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. गुणवंत भडके यांनी केले.
