डुग्गीपार पोलीस ठाण्यात शांतता समितीची सभा संपन्न
सुशील लाडे
सडक अर्जुनी: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी डुग्गीपार पोलीस ठाण्यात आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी शांतता समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या सभेत परिसरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विविध समाजघटकांनी सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करण्यासाठी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी पोलीस ठाणेदार कमलेश सोनटक्के यांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद अथवा आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले.
सभेदरम्यान वाहतूक व्यवस्था, ध्वनिक्षेपकाचा मर्यादित वापर, सोशल मीडियावरील अफवा व आक्षेपार्ह संदेश, तसेच सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ठाणेदार कमलेश सोनटक्के, सहा.पो. नि .जावेद शेख, पोलिस कर्मचारी सुशील रामटेके पोलीस हवालदार,महेंद्र सोनवाणे पो.ना., उदेभान रुखमोडे पो. शिपाई, तसेच शांतता समितीचे सदस्य डॉ.अविनाश काशिवार, राजेश नंदागवळी, प.स.सभापती चेतन वळगाये, माजी.सभापती संगीता खोब्रागडे, डॉ. सुशिल लाडे, डॉ.राजकुमार भगत, येरनेजी, वसंत गहाणे , शाहिद पटेल , युनुस पटेल, राजू शेख, सुबुर सौदागर, इत्यादी उपस्थित होते. उपस्थित सदस्यांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
शांतता, सलोखा आणि सामाजिक एकोपा कायम ठेवण्यासाठी पोलीस व नागरिकांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
