रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई
सडक अर्जुनी : तालुक्यात सुरू असलेल्या रेतीच्या अवैध उत्खनन व बिनापरवाना वाहतुकीविरोधात महसूल विभागाने पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. मौजा रेंगेपार/द ते कन्हारपायली रस्त्यावर रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करून तो तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 
बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता मौजा रेंगेपार/द ते कन्हारपायली रस्त्यावर रेतीची अवैध व बिनापरवाना वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल विभागाने कारवाई केली. मा. तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम महसूल अधिकारी लिलाधर कापगते, हनुमंत आंबेकर, उमेश रहांगडाले, हर्ष कुमार उईके व जागेश्वर प्रधान यांच्या पथकाने रेतीने भरलेल्या ट्रॅक्टरला अडवून कारवाई केली.
सदर ट्रॅक्टर नरेश महादेव शेंडे, रा. डोंगरगाव यांच्या मालकीचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रॅक्टरमध्ये रेती भरून तो कन्हारपायलीच्या दिशेने जात असताना महसूल विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित ट्रॅक्टर तहसील कार्यालय, सडक अर्जुनी येथे जमा करण्यात आला.
अवैध रेती वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये
सडक अर्जुनी तालुक्यात रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे. नदीपात्रातून बिनापरवाना रेती उत्खनन करून तिची वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा संदेश या कारवाईतून मिळत आहे.
रेतीची चोरी करून शासनाचा महसूल बुडविणाऱ्या तसेच पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्याने रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली असून, महसूल विभागाच्या धडक कारवाईमुळे रेतीचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महसूल विभागाने अशाच प्रकारे सातत्याने कारवाई सुरू ठेवावी, तसेच अवैध रेती उत्खनन व वाहतुकीला पूर्णपणे आळा घालावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
