आणि..धावत्या ओम्नीचा दरवाजा उघडला; चिमुकले राष्ट्रीय महामार्ग वर कोसळले!
सुशिल लाडे..
•खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांचा थरारक प्रसंग; ग्रामस्थांच्या तत्परतेने अनर्थ टळला
सडक अर्जुनी (गोंदिया), दि. १९ सप्टेंबर :
तालुक्यातील खजरी येथे शाळकरी विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या ओम्नी वाहनाचा मागील दरवाजा अचानक उघडल्याने काही चिमुकले धावत्या वाहनातून थेट राष्ट्रीय ्महार्गावर (753) वर कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, दि. १८ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती असून, ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. 
प्राप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खजरी येथील ‘लिटल एंजल पब्लिक स्कूल’ मधील विद्यार्थ्यांना ओम्नी वाहन क्रमांक एमएच ३५ ई १८०८ मधून घरी सोडण्यात येत होते.
गोंदिया-कोहमारा मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वर वाहन जात असताना अचानक वाहनाचा मागील दरवाजा उघडला. कारण काय तर मागील दरवाज्याला बारीक ताराने लटकवले होते. त्यावेळी वाहनातील काही विद्यार्थी रस्त्यावर पडल्याचे सांगण्यात येत आहे. 
घटना लक्षात येताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित केले. घटनेची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली असून, संबंधित वाहन ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
शाळेच्या व्यवस्थापनासह शालेय वाहनाच्या सुरक्षेवर प्रश्न?!
या घटनेनंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा फिटनेस, परवाना, विमा, वाहनाची सुरक्षितता तसेच चालकाची पात्रता, शाळे संबंधी सर्व नियम याबाबत नियमांचे पालन झाले होते का, याची तपासणी होणे आवश्यक असल्याची मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या माहितीनुसार संबंधित शाळेत KG-1, KG-2 सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या शाळेची मान्यता, विद्यार्थ्यांची संख्या, शालेय वाहतूक व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे.
“संपूर्ण शाळेची चौकशी करण्यात येईल”
या प्रकरणाबाबत शिक्षण विभागाचे B.O. सुभाष बागडे यांच्याशी विचारणा केली असता, संपूर्ण शाळेची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
RTO, पोलिस व शिक्षण विभागाने संयुक्त तपासणीची मागणी
एका वाहनाचा दरवाजा धावत्या अवस्थेत उघडून विद्यार्थी रस्त्यावर पडण्याची घटना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर मानली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची RTO, पोलिस प्रशासन आणि शिक्षण विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे. 
दरम्यान, या घटनेचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून पोलिस विभागाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचल्याची माहिती आहे. त्यामुळे संबंधित विभागांच्या चौकशीतून शालेय वाहनाच्या सुरक्षेचे नियम पाळले होते की नाही आणि घटनेमागील नेमके कारण काय, हे स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही शाळा, वाहनचालक आणि संबंधित यंत्रणांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
कमलेश सोनटक्के पोलिस निरीक्षक डूग्गीपार
” सदर वाहन ठाण्यात जमा केला असून RTO मार्फत चौकशी केली जाहील आणि तसेच सर्व शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनांनी फिटनेस बाबत सुद्धा चौकशी केली जाणार तसे पत्र शाळेला पाठवले जाणार.
