Friday, April 17, 2026
अर्जुनी मोर

धाबेटेकडी परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

MKM NEWS 24 – डॉ. सुशिल लाडे 

अर्जुनी मोरगाव  : तालुक्यातील धाबेटेकडी परिसरात काही दिवसांपासून भीतीचे वातावरण निर्माण करणारा बिबट्या अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले. मंगळवारी (दिनांक 14) ला रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली असून गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

१० एप्रिल रोजी अंगणात खेळत असलेल्या सहा वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. त्या घटनेनंतर परिसरात भीतीचे सावट पसरले होते. वन विभागाने तत्काळ सापळे लावून आणि शोधमोहीम राबवून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते.

वन विभाग, बचाव पथक आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून अखेर मंगळवारी रात्री बिबट्याला जेरबंद करण्यात आले. पकडण्यात आलेला बिबट्या अंदाजे चार वर्षांचा नर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईत उपवनसंरक्षक पवन कुमार जोंग, प्रकाष्ट निष्कासन अधिकारी अविनाश मेघराम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे, तसेच बचाव पथकातील सतीश शेंडे, अमित राऊत,शुभम मेश्राम, अमोल चौबे, विकी ब्राह्मणकर, इत्यादी सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. बिबट्याला पुढील तपासणीसाठी नागपूर येथे हलवण्यात आले आहे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र बहुरे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या घटनेमुळे काही दिवसांपासून दहशतीत असलेल्या गावकऱ्यांनी आता दिलासा व्यक्त केला असून वन विभागाच्या कार्याचे कौतुक केले आहे.

error: Content is protected !!