गोंदिया पोलिसांची धडाकेबाज कारवाई : मोटारसायकल चोरी करणारे दोन अट्टल आरोपी जेरबंद
गोंदिया, दि. १७ एप्रिल : गोंदिया जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्कृष्ट कामगिरी करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत गोंदिया जिल्ह्यातील तीन आणि नागपूरमधील एक असे एकूण चार गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून २ लाख १० हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. दिनांक १६ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना गुप्त माहिती मिळाली की, धीरज भूषण फुंडे (रा. कालीमाटी) आणि तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे (रा. कोंढा कोसारा, ता. पवनी, जि. भंडारा) हे चोरीच्या मोटारसायकली विक्रीसाठी गोंदियात येणार आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे तीन मोटारसायकली जप्त केल्या:
हिरो होंडा स्प्लेंडर (काळी) – अंदाजे किंमत ₹५५,०००
हिरो स्प्लेंडर (सिल्वर-काळी) – अंदाजे किंमत ₹७५,०००
हिरो स्प्लेंडर (काळी) – अंदाजे किंमत ₹८०,०००
जप्त वाहनांची एकूण किंमत ₹२,१०,००० इतकी आहे. तपासादरम्यान ही वाहने आमगाव पोलीस स्टेशनमधील दोन, गोंदिया शहर पोलीस स्टेशनमधील एक आणि नागपूरच्या प्रतापनगर पोलीस स्टेशनमधील एक अशा चार गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, आरोपींनी आणखी एक मोटारसायकल छत्तीसगडमधील कवर्धा येथे लपवून ठेवल्याची माहिती दिली असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर आरोपींना पुढील तपासासाठी गोंदिया शहर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी सपोनि धीरज राजूरकर, सहायक फौजदार राजू मिश्रा, पोहवा महेश मेहर, दीक्षितकुमार दमाहे, सुबोधकुमार बिसेन, इंद्रजित बिसेन, पो.शि. राकेश इंदूरकर आणि चापोशि घनश्याम कुंभलवार यांच्या पथकाने पार पाडली.
