सडक अर्जुनी नगरपंचायत वॉर्ड क्र. ११ मध्ये पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इच्छुकांकडून हालचालींना वेग
सडक अर्जुनी, दि. १८ मे : सडक अर्जुनी नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक ११ च्या पोटनिवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम प्रशासनाकडून घोषित करण्यात आला असून, स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी संपर्क मोहिमा, बैठका आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 
निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी ६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी १२ मे २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांना नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी १८ मे ते २५ मे २०२६ हा कालावधी देण्यात आला असून, त्यामुळे इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्राप्त अर्जांची छाननी २६ मे रोजी केली जाणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २८ मे निश्चित करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार असून, त्याचबरोबर निवडणूक चिन्हांचे वाटपही करण्यात येणार आहे.
वॉर्ड क्रमांक ११ साठी मतदान २० जून २०२६ रोजी होणार असून सकाळी ७.३० ते आवश्यक असल्यास सायंकाळी ५.३० या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. त्यानंतर २१ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
ही पोटनिवडणूक स्थानिक राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाची मानली जात असून विविध राजकीय पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काही नव्या चेहऱ्यांचीही चर्चा रंगू लागली असून, अपक्ष उमेदवारदेखील मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे येत आहे.
दरम्यान, वॉर्डातील नागरिकांचे लक्ष आता कोणाला उमेदवारी मिळणार, प्रचारात कोण आघाडी घेणार आणि निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे लागले आहे.
